सोनाळीत तीन शिका-यांना पकडले, दोन बंदुका आणि सात काडतुसे जप्त;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 08:26 PM2018-03-12T20:26:15+5:302018-03-12T20:26:15+5:30
वैभववाडी (सिंधुदुर्ग):शिकारीला गेलेल्या तिघांना पहाटे सोनाळीत अटक केली. त्यांच्या ताब्यातील दोन बंदुका आणि 7 जीवंत काडतुसे जप्त केली आहेत.
वैभववाडी (सिंधुदुर्ग) : शिकारीला गेलेल्या तिघांना पहाटे सोनाळीत अटक केली. त्यांच्या ताब्यातील दोन बंदुका आणि 7 जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. ते शिमग्याच्या गाव पारधीसाठी गेले होते. विभागीय गस्तीवर असलेले कुडाळचे पोलीस निरीक्षक ए. एल. भोसले यांनी ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, कुडाळचे पोलीस निरीक्षक ए. एल. भोसले विभागीय गस्तीवर होते. पहाटे 3 च्या सुमारास सोनाळीत रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पो जवळ त्यांना 5 ते 7 लोकांचा घोळका दिसला. त्यामुळे थांबून चौकशी केली. त्यावेळी सोनाळीतील सदानंद मोतीराम पाडावे(47) व लवू परशुराम नर(34) यांच्या ताब्यात दोन काडतुस बंदुका आणि 7 जीवंत काडतुसे आढळून आली.
त्यापैकी नर याच्या ताब्यातील बंदुक ही कोकिसरेतील जगन्नाथ सहदेव गुरव याची होती. त्यामुळे बंदुका आणि काडतुसांसह पाडावे आणि नर यांना ताब्यात घेत गुरवसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवीत दोघांनाही तात्काळ अटक केली. त्यानंतर सकाळी जगन्नाथ गुरव याला अटक केली. त्यांना कणकवली न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. के. घाडगे करीत आहेत.