पर्यटन महोत्सवाची धूम
By admin | Published: December 23, 2014 10:20 PM2014-12-23T22:20:49+5:302014-12-23T23:43:04+5:30
पाच दिवस कार्यक्रम : नेते, कलाकारांची उपस्थिती
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेच्या ८ व्या पर्यटन महोत्सवाची पाच दिवसांची धूम बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या महोत्सवानिमित्त विविध कलाकार तसेच नेते मंडळी सावंतवाडीत येणार आहेत. हा महोत्सव पहिल्यांदाच शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत होत असल्याने त्याला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच तत्कालीन नगराध्यक्ष दीपक केसरकर यांनी या पर्यटन महोत्सवाची सुरूवात केली आणि आज ते राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कार्यरत असल्याने महोत्सवादरम्यान त्यांचा होणारा नागरी सत्कार हे या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य मानले जात आहे.
सावंतवाडी नगरपालिका गेली ८ वर्षे पर्यटन महोत्सव आयोजित करीत आहे. दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे हा महोत्सव तसा रंगीबेरंगी ठरत आला आहे. सावंतवाडी नगरपालिकेने प्रथमच महोत्सवाचे आयोजन केले आणि त्याला यशही आले. पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पर्यटक सावंतवाडीत आले आणि येथील व्यापाराही चालना मिळाली. महोत्सवाच्या निमित्ताने शंभराहून अधिक स्टॉल उभारले जातात. या स्टॉलमध्ये खाद्य पदार्थ तसेच नवनवीन कपड्यांचे सेल, भांड्यांचे सेल, वेगवेगळी प्रदर्शने आयोजित करण्यात येतात. महोत्सवाच्या पाच दिवसात स्टॉलधारकांचा लाखो रूपयांचा व्यवसाय होतो.
सावंतवाडीत पर्यटन महोत्सव हा पाच दिवस चालतो. अवघ्या ३१ डिसेंबरच्या तोंडावर हा महोत्सव येत असल्याने गोव्याला जाणारा पर्यटकही सावंतवाडीत थांबतो, हे विशेष. याचाच नगरपालिकेने पुरेपूर फायदा उचलला आहे. यावर्षीच्या महोत्सवाची वैशिष्ट्यही वेगवेगळी आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवक तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या महोत्सवाला शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, आरोग्यमंत्री दीपक सावंत उपस्थित राहणार आहेत, तर समारोपाला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह अन्य नेते मंडळी येणार आहेत. याच निमित्ताने सावंतवाडीचे सुपुत्र आणि सावंतवाडी महोत्सवाचे जनक, तत्कालीन नगराध्यक्ष दीपक केसरकर यांची राज्यमंत्री मंडळात निवड झाल्याने त्यांचा सत्कार होणार असून हे या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य मानले जात आहे. पुढील पाच दिवसात विविध कलाकार या महोत्सवात अवतरणार आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या पर्यटकांना विविध मनोरंजनात्मक काय्रक्रमांबरोबरच विविध स्टॉलमधूून विविध पदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. (प्रतिनिधी)
सावंतवाडीवासीयांसाठी भरगच्च कार्यक्रम
सावंतवाडी नगरपालिकेच्या पर्यटन महोत्सवाची पाच दिवसांची धूम २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यानिमित्त पहिल्या दिवशी शाहीर आझाद नायकवाडीचा कार्यक्रम, तर दुसऱ्या दिवशी ‘संसाराची आस’, तिसऱ्या दिवशी झी मराठी सारेगमचा ‘डान्स इंडिया डान्स’चा कार्यक्रम होणार आहे. चौथ्या दिवशी अटल प्रतिष्ठान आयोजित ‘शिवराज्याभिषेक’, तर समारोपाच्या दिवशी ‘जल्लोष २०१४’ आयोजित करण्यात आला आहे.