तारकर्ली-देवबाग किनाऱ्याला पर्यटकांची पसंती
By Admin | Published: December 27, 2015 10:22 PM2015-12-27T22:22:25+5:302015-12-28T00:44:38+5:30
जलक्रीडा प्रकारांचा लुटला आनंद : मालवणातील पर्यटन स्थळे गजबजली
मालवण : मालवणातील ‘किल्ले सिंधुदुर्ग’ आणि तारकर्ली-देवबाग येथील किनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या पसंतीस उतरली असून मालवण, वायरी, तारकर्ली आणि देवबाग परिसर पर्यटकांनी बहरून गेला आहे. कर्ली खाडीपात्रात वसलेल्या त्सुनामी बेटावर पर्यटकांचा ओघ कायम असून तेथे सुरु असलेल्या विविध जलक्रीडा प्रकारांचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. तारकर्ली-देवबाग परिसरात पर्यटक जलक्रीडा प्रकारांचा चित्तथरारक अनुभव घेत आहेत. दरम्यान, मालवणसह तारकर्ली-देवबागकडे जाणारा मार्ग अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त पुरविण्यात आला असला तरी वाहतूक कोंडी सोडविण्यास पोलिसांना मोठी डोकेदुखी ठरत आहे.पर्यटकांना पार्कींग करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने रस्त्यातच गाड्या उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अजून आठवडाभर पर्यटकांची वर्दळ अशीच सुरु राहणार असल्याचे पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. गत आठवड्यापासून मालवणात पर्यटकांचा ओघ चांगलाच वाढला आहे. रविवारी तो कायम होता. पर्यटकांच्या विक्रमी गर्दीने मालवणनगरी तसेच सर्व पर्यटन स्थळे हाऊसफुल झाली आहेत. रस्त्या-रस्त्यावर वाहनांच्या लांबच लाब रांगा दिसून येत होत्या. निवासी स्वरूपातील सर्व रूम फुल झाल्याने काही पर्यटकांनी मित्र, नातेवाईक यांच्या घरात तर काहींनी चक्क स्थानिकांच्या कुंपणांचा आधार घेतलाय. तसेच काहींना गाडीतच रात्र काढावी लागत आहे. देवबाग कर्ली, खाडीपात्रातील त्सुनामी बेटावर बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स आदी जलक्रीडा प्रकारासाठी दिवसभर मोठी गर्दी आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन केले आहे मात्र शहरातील अरुंद रस्ते, अपुऱ्या पार्किंग सुविधा याबाबत तीव्र स्वरुपात पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
हॉटेल व्यवसाय तेजीत : मालवणी थाळीवर ताव
आगाऊ बुकिंग केल्यामुळे मालवणात १८ डिसेंबरपासून पर्यटकांनी विक्रमी गर्दी केली आहे. सुटी तसेच नाताळ सणाची मजा लुटत थर्टी फर्स्टचा आनंद पर्यटकांकडून साजरा केला जाणार आहे. किल्ले सिंधुदुर्ग, स्कुबा डायव्हिंग, रॉक गार्डन, चिवला बीच, तसेच तारकर्ली, देवबाग येथील सर्व पर्यटन स्थळे गजबजून गेली आहेत. येथील जलक्रीडा प्रकाराला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. मालवणी जेवणावरही पर्यटकांनी चांगलाच ताव मारल्याचे चित्र असून मालवण शहरासह देवबाग, तारकर्ली येथील हॉटेल्स व्यवसाय तेजीत असल्याचे बोलले जात आहे.