अवैध दारु वाहतुकीवर कारवाई, कुडाळातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 11:20 AM2020-01-07T11:20:13+5:302020-01-07T11:21:52+5:30
राज्य उत्पादन शुल्क कुडाळच्या पथकाने पणदूर तिठा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची अवैधरितीने वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोसह सुमारे ३३ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. टेम्पोचालकालाही अटक करण्यात आली असून, ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.
कुडाळ : राज्य उत्पादन शुल्क कुडाळच्या पथकाने पणदूर तिठा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची अवैधरितीने वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोसह सुमारे ३३ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. टेम्पोचालकालाही अटक करण्यात आली असून, ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क कुडाळ पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी पणदूर तिठा येथे सापळा रचला होता. सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पोला तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा केला.
या टेम्पोची तपासणी केली असता मागचा टेम्पो रिकामी होता. मात्र, सखोल तपासणी केली असता टेम्पोच्या केबिनच्या पाठीमागे असलेल्या हौद्यात विशिष्ट प्रकारे तयार केलेल्या जागेत गोवा बनावटीच्या दारुचे एकूण २४० खोके आढळून आले. या टेम्पोसह सर्व दारूसाठा ताब्यात घेण्यात आला. तसेच टेम्पोचालक आप्पा बलभिम माने (३६, रा. पोखरापूर, सोलापूर) याला अटक करण्यात आली.
कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार व जिल्हा अधीक्षक डॉ. बी.एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पथकाचे दुय्यम निरीक्षक ए. आर. जगताप, प्रभारी निरीक्षक एन.पी.रोटे, सी.डी.पवार, जवान वाहन चालक एच.आर.वस्त, जवान प्रसाद माळी, महिला जवान एम.आर.चव्हाण, विजय राऊळ, प्रशांत परब व अवधुत सावंत यांनी केली. या गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक ए.आर.जगताप करीत आहेत.