झाड कोसळले, वैभववाडी-उंबर्डे मार्ग तासभर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 04:09 PM2019-08-03T16:09:43+5:302019-08-03T16:10:51+5:30
वैभववाडी-उंबर्डे मार्गावर कुसूर पिंपळवाडी येथे गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झाड कोसळले. त्यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाल्याने विद्यार्थी व कर्मचारी अडकून पडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जेसीबीने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.
वैभववाडी : वैभववाडी-उंबर्डे मार्गावर कुसूर पिंपळवाडी येथे गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झाड कोसळले. त्यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाल्याने विद्यार्थी व कर्मचारी अडकून पडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जेसीबीने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.
पिंपळवाडी थांब्याच्या अलीकडे हे झाड कोसळले होते. त्यामुळे उंबर्डे, भुईबावडा परिसरातून वैभववाडीत येणारे विद्यार्थी तसेच वैभववाडीतून त्या भागात जाणारे शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, बँक कर्मचारी अडकून पडले होते. तहसील कार्यालयातील दूरध्वनी कोणीच उचलत नसल्याने अखेर प्रवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे संपर्क साधला.
त्यानंतर आपत्कालीन यंत्रणेची वाट पाहून स्थानिक ग्रामस्थ, प्रवाशांनी रस्त्यावरील झाडाच्या काही फांद्या तोडून दुचाकींच्या एकेरी वाहतुकीपुरता मार्ग खुला केला. त्यानंतर बांधकाम विभागाच्या जेसीबीने झाड हटवून मार्गावरील तासभर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, वैभववाडी तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असून पूरस्थिती ओसरली आहे. मात्र, सातत्याने पडणाऱ्या पावसाने सर्वत्र दलदल झाली आहे. त्यामुळे वारा असल्यास झाडे पडण्याच्या घटना घडत आहेत.
आपत्ती कक्षाच्या दूरध्वनीला प्रतिसाद मिळेना
नैसर्गिक आपत्ती काळात तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी वैभववाडी तहसील कार्यालयात स्थापन केलेला आपत्ती व्यवस्थापन कक्ष नामधारी ठरत आहे. गुरुवारी सकाळी त्याचा प्रत्यय आला. कुसूर पिंपळवाडी येथे सकाळी ८.३० च्या सुमारास झाड कोसळल्याने वैभववाडी-उंबर्डे मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी विशेषत: शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयात संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला.
परंतु जवळपास १५ ते २० मिनिटे आपत्ती कक्षातील दूरध्वनी खणाणला. मात्र, प्रतिसाद काही मिळाला नाही. हा प्रकार वारंवार अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती काळात मदतीसाठी असलेला तहसीलमधील आपत्ती कक्ष नामधारी ठरला असल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.