अवैध दारु वाहतूक प्रकरणी कोल्हापूरचे दोघे ताब्यात, दारूसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 12:39 PM2024-12-06T12:39:01+5:302024-12-06T12:39:31+5:30
बांदा : राज्य उत्पादन शुल्काच्या इन्सुली पथकाने आलिशान महागड्या मोटारीतून दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील दोघांना राज्य ताब्यात घेतले ...
बांदा : राज्य उत्पादन शुल्काच्या इन्सुली पथकाने आलिशान महागड्या मोटारीतून दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील दोघांना राज्य ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी आठ वाजता जुन्या बांदा-पत्रादेवी मार्गावर पंजाबी ढाब्याच्या परिसरात करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ३९ हजार २५० रुपये किमतीच्या दारूसह एकूण ६ लाख ३९ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कोल्हापूर येथील दोघांना ताब्यात घेतले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोव्याहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूची आलिशान मोटारीतून बेकायदा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाका पथकाला मिळाली होती. त्यानुसार जुन्या बांदा - पत्रादेवी मार्गावर पंजाबी फॅमिली ढाब्याजवळ सापळा रचण्यात आला होता. गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून येणारी आलिशान मोटार (एमएच ०२ सीएच ३१३१) तपासणीसाठी थांबविण्यात आली.
गाडीची तपासणी केली असता गाडीच्या पाठीमागील सीटवर तसेच डिकीत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा अवैध साठा आढळून आला. पथकाने १ लाख ३९ हजार २५० रुपये किमतीची दारू, ५ लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण ६ लाख ३९ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही संशयितावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी चालक ऋषिकेश प्रफुल्ल जाधव (२७) व शीतल गणपती शेटे (४५, दोघे रा. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई इन्सुली तपासणी नाका पथकाचे निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, विवेक कदम, जवान रणजित शिंदे, दीपक वायदंडे, सतीश चौगुले, सागर सूर्यवंशी, अभिषेक खत्री यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करत आहेत.