सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; आंबा, काजू पिकांना बसणार फटका
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 20, 2024 12:40 PM2024-04-20T12:40:39+5:302024-04-20T12:41:03+5:30
सिंधुदुर्ग : गेले चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० च्या दरम्यान होता. त्यातच आद्रतेतही मोठी झाल्याने ढगाळ वातावरण ...
सिंधुदुर्ग : गेले चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० च्या दरम्यान होता. त्यातच आद्रतेतही मोठी झाल्याने ढगाळ वातावरण होते. आज, शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील कणकवली आणि अन्य तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी संततधार पाऊस बरसला. तर कणकवली शहर आणि परिसरात केवळ पावसाने शिडकावा केला. पावसाने काजू, आंबा पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
अवकाळी पावसाने काही भागातील आंबा बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांत उष्मा वाढला होता. अंगाची लाहीलाही होत होती. तर अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे अवकाळी पाऊस बरसण्याची चाहूल लागली होती. त्यातच मागील चार दिवस ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस काही पडत नव्हता. आज, सकाळपासून मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. काही भागात झालेल्या संततधार पावसाने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, काही काळ पाऊस पडून तो थांबल्याने आता दिवसभर आणखीन उष्णता जाणवत होती.