शिक्षक भरतीनंतरही सिंधुदुर्गात रिक्त शिक्षक पदांचे ग्रहण, ३८७३ मंजूर पदांपैकी किती पदे भरली.. जाणून घ्या
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 19, 2024 06:49 PM2024-06-19T18:49:22+5:302024-06-19T18:49:45+5:30
उर्वरित रिक्त पदे केव्हा भरणार ?
मनोज वारंग
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली शिक्षक पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया होऊनही केवळ ५१३ एवढीच पदे नव्याने भरली आहेत. जिल्ह्यातील एकूण ३८७३ मंजूर पदांपैकी भरती प्रक्रियेनंतर ३२०४ एवढी पदे भरली आहेत. अद्यापही ६६९ पदे रिक्तच राहिली आहेत. जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीनंतरही जिल्ह्याचे रिक्त पदांचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही.
गेली अनेक वर्षे शिक्षक भरती न झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त झाली होती. त्यातच आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांच्या रिक्त पदांमध्ये आणखीनच भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३८७३ एवढी शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ २६९१ एवढी पदे कार्यरत होती तर सुमारे ११८२ एवढी पदे रिक्त झाली होती.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले
ही पदे भरावीत यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलने, उपोषणे सुरू झाली होती. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत होते. याचा विचार करून अखेर शासनाने भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेत शिक्षक पद भरती प्रक्रिया पार पाडली. या भरती प्रक्रियेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ ५१३ एवढीच पदे भरली गेली.
पदवीधर १४२, उपशिक्षक ३७१ पदे भरली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेल्या शिक्षक पदभरती प्रक्रियेत पदवीधर शिक्षकांची १४२ पदे तर उपशिक्षकांची ३७१ पदे भरण्यात आली आहेत. अद्यापही पदवीधर शिक्षकांची २३३ व उपशिक्षकांची ४३६ एवढी पदे रिक्त राहिली आहेत. अद्यापही ६६९ एवढी पदे रिक्त असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली असली तरी अद्यापही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त पदांचा विचार केला असता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रिक्त पदांचे ग्रहण सुटले नसल्याचे दिसून येत आहे.
उर्वरित रिक्त पदे केव्हा भरणार ?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था दर्जेदार व सुरळीत पार पाडण्यासाठी अद्यापही ६६९ एवढी रिक्त पदे भरण्याची गरज असून, उर्वरित रिक्त पदे केव्हा भरणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे तर उर्वरित पदांवर स्थानिक डीएड बेरोजगार उमेदवारांना संधी द्यावी, अशीही मागणी होऊ लागली आहे.