कुडाळ : महामार्गावर उडणाऱ्या धुरळ््यावरून आमदार वैभव नाईक यांनी दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. नेहमी शांत असणाऱ्या नाईक यांचा रुद्रावतार प्रथमच कार्यकर्त्यांनी यावेळी अनुभवला.
तुम्ही रस्त्यावर पाणी का मारत नाही? रस्त्यावर उडणारा धुरळा तुम्हांला दिसत नाही का? तुम्हांला धुरळा उडतो तिथे बांधून ठेवले पाहिजे, मगच शहाणपणा सुचेल, असे सांगून कार्यकर्त्यांच्या समक्षच अभियंत्याचा हात धरून फरफटत नेत त्याला महामार्गाची दुर्दशा दाखविली. अखेर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मध्यस्थीनंतर या वादावर पडदा पडला व आमदार नाईक शांत झाले.कुडाळ काळप नाक्यासमोरील पुलावर महामार्गाचे काम सुरू असून, तेथे उडणाऱ्या धुरळ्यामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आमदार नाईक यांनी दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
जिथे धुरळा उडतो तिथे तुम्हांला बांधून ठेवले पाहिजे. मगच इतरांना होणाऱ्या त्रासाची जाणीव होईल, असे सांगत तेथे असलेल्या अभियंत्याचा हात धरून त्याला महामार्गावरून इकडे-तिकडे फिरवून महामार्गाची दयनीय अवस्था त्यांनी दाखविली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, अतुल बंगे, तालुकाप्रमुख राजन नाईक, नगरसेवक सचिन काळप, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे, सागर भोगटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.पालकमंत्र्यांनीही अधिकाऱ्यांना सुनावलेयावेळी पालकमंत्री दीपक केसरकर हे जिल्हा मुख्यालयात जात होते. हा प्रकार पाहून त्यांनी आपल्या वाहनांचा ताफा तेथेच थांबविला. अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा करून त्यांनी आमदार नाईक यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. महामार्गावरील उडणाऱ्या धुळीमुळे लोक आम्हांला विचारतात.
हे सर्व तुमच्या हलगर्जीपणाने होते, असे सांगून संताप व्यक्त केला. यावर कंपनीचे अधिकारी निरूत्तर झाले. अखेर पालकमंत्री केसरकर यांनी असे परत होणार नाही याची दखल घ्या, असे अधिकाºयांना सुनावून तसे लिहूनही घेतले. त्यानंतर या वादावर पडदा पडला.