कणकवली : एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी व एसटीचे प्रभारी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक यांची विभागीय कार्यालयात मंगळवारी चर्चा सुरू होती. त्याच दरम्यान महाराष्ट्र एसटी कामगार या मान्यताप्राप्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबधित चर्चेला हरकत घेतली. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मान्यताप्राप्त संघटनेला चर्चा करता येते का? असा प्रश्न उपस्थित करीत त्याबाबतचे लेखी पत्र दाखवा.अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. या मुद्यावरून दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.त्यानंतर मान्यताप्राप्त संघटनेचे पदाधिकारी कार्यालया बाहेर गेल्यावर शिवसेनाप्रणित एसटी कामगार सेने सोबतची चर्चा प्रभारी विभाग नियंत्रकांनी पूर्ण केली. मात्र ही चर्चा पूर्ण होताच भाजपा पदाधिकाऱ्यांनीही विभाग नियंत्रक कार्यालयात प्रवेश करत एसटी कामगार असलेल्या व शिवसेना पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कारवाई का झाली नाही ? याप्रकरणी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
शिवसेना नेते संदेश पारकर, संदेश सावंत- पटेल, सचिन सावंत, मनस्वी परब यांच्या नेतृत्वाखाली एसटी कामगार सेना पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास प्रभारी विभाग नियंत्रक तथा यंत्र अभियंता रमेश कांबळे यांच्या कार्यालयात रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना टी.टी.एस म्हणून मान्यता देण्याच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू केली होती.
मात्र, विभाग नियंत्रक यांना अशाप्रकारे अमान्यताप्राप्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करता येते का? असा सवाल करत , तसे असेल तर त्याबाबतचे लेखी पत्र द्या. अशी मागणी मान्यताप्राप्त संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष अनंत उर्फ अमित रावले, सिकंदर बटवाले,अमिता राणे आदींनी केली. यावरून एसटी कामगार सेना व महाराष्ट्र एसटी कामगार संघटना यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.संदेश पारकर यांनी आमची चर्चा अगोदर सुरू आहे. त्यामुळे ती चर्चा झाल्यानंतर तुम्ही चर्चा करा.असे स्पष्ट केले. चर्चेअंती प्रभारी विभाग नियंत्रक यांनी मान्यताप्राप्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर थांबण्यास सांगत ही चर्चा आटोपल्यानंतर पुन्हा तुमच्याशी चर्चा करतो असे सांगितले. त्यानंतर मान्यताप्राप्त संघटनेचे पदाधिकारी बाहेर गेले. कामगार सेना पदाधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
ही चर्चा झाल्यानंतर संबधित पदाधिकारी बाहेर जाताच भाजपाचे कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , युवा मोर्चा संघटन सचिव संदीप मेस्त्री ,शहराध्यक्ष अण्णा कोदे व इतर पदाधिकारी यांनी विभाग नियंत्रक कार्यालयात धाव घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. शिवसेना पदाधिकारी असलेल्या एका एसटी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल आहे. आम्ही यापूर्वी मागणी करूनही त्याच्यावर काय कारवाई झाली? अशाप्रकारे कर्मचाऱ्याला पक्षीय पद घेता येते का ? असा सवाल केला. तसेच १५ ऑगस्ट पर्यंत कारवाई न झाल्यास कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशाराही दिला.