ग्राम कृषी विकास समिती कागदावरच राहू नये;शेतकर्यांची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 01:21 PM2020-10-10T13:21:29+5:302020-10-10T13:25:10+5:30
Agriculture Sector, sindhdudurgnews, farmar, grampanchyat शेतीच्या सर्वांगीण विकासाबरोबरच गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करणे तसेच अन्य उद्देश समोर ठेवून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, ही समिती फक्त कागदावरच न रहाता खऱ्या अर्थाने कृषी विकासाला दिशा देण्यासाठी व शेतकरी आर्थिक समृध्द कसा होईल या उद्देशाने ग्रामपातळीवर कार्यरत रहावी अशी अपेक्षा अनेक शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सुधीर राणे
कणकवली : शेतीच्या सर्वांगीण विकासाबरोबरच गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करणे तसेच अन्य उद्देश समोर ठेवून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, ही समिती फक्त कागदावरच न रहाता खऱ्या अर्थाने कृषी विकासाला दिशा देण्यासाठी व शेतकरी आर्थिक समृध्द कसा होईल या उद्देशाने ग्रामपातळीवर कार्यरत रहावी अशी अपेक्षा अनेक शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
ग्राम कृषी विकास समितीच्या माध्यमातून शेतकर्यांना गावातच कृषी विषयक योजनांची माहिती व मार्गदर्शन मिळेल, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या समितीकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेती हा ग्रामीण भागात महत्वाचा व्यवसाय आहे. अनेक कुटुबांच्या उपजिविकेचे ते साधन आहे. मात्र , हवामानातील बदल, बदलते पर्जन्यमान, कीड व रोग, सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध न होणे, शेती मालाच्या दरामध्ये अचानक घसरण होणे आदी कारणांमुळे शेती व्यवसायातून शाश्वत उत्पन्न मिळेलच असे सांगता येत नाही.
या सर्व समस्यांवर ग्रामीण स्तरावर विचारविनिमय करून मार्गदर्शन होणे गरजेचे असते . त्यासाठी ग्रामस्तरावर समिती आवश्यक असल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्यामुळे ग्राम कृषी विकास समिती प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा उद्देश खूप चांगला आहे .
कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे या समितीने सक्षमपणे काम केल्यास सोपे होणार आहे. तसेच ग्रामीण भागात जे ठराविक ग्रामस्थ पुन्हा पुन्हा योजनांचा लाभ घेतात त्यांनाही त्यामुळे अटकाव होवू शकणार आहे. या समितीमध्ये सरपंचांसह १४ सदस्य असणार आहेत.
समितीने शासनाच्या कृषी विषयक सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रसार व प्रचार करण्याबरोबरच योजनांचा नियमितपणे आढावा घ्यायचा आहे. स्थानिक स्तरावरील हवामान, पाऊस, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत लक्षात घेवून विविध प्रकारच्या पीक लागवडीसंबंधी नियोजन व शेतकर्यांना मार्गदर्शन करायचे आहे.
दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम लागवड आदी शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी समितीने संबंधित विभागांच्या अधिकार्यांना निमंत्रित करावयाचे आहे .
त्यामुळे शासनाकडून अशा वेगवेगळ्या समित्या स्थापन करून ग्राम विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जातो. तशीच ही कृषी विकास समिती असून शेतकरी वर्गातून निश्चितपणे तिचे स्वागत होणार आहे. मात्र ही समिती कागदावर न राहता खर्या अर्थाने शेतकर्यांना दिशा देणारी ठरावी. अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत असून तसे झाले तर गावाचा आर्थिक दृष्ट्या सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.
निर्णय चांगला, अंमलबजावणी आवश्यक !
शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. पण समिती पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊन तिचा उद्देश सफल झाला पाहिजे. समितीने आपल्या कार्यकक्षेत येणाऱ्या विविध मुद्यांची अंमलबजावणी सक्षमपणे केल्यास शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल.
- संदीप कदम,
शेतकरी .