कणकवली : महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ कृष्णा गवंडळकर यांची निवड करण्यात आली.विश्वनाथ गवंडळकर हे गेली अनेक वर्षे सिंधुदुर्गातील वारकरी परंपरा जोपासण्याचे व ती वृध्दींगत करताना समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांची वारकरी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने वारकरी सांप्रदायमधून अभिनंदन होत आहे.आजचा समाज शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावा तसेच समाज सुसंस्कारी, सदाचारी व व्यवसनमुक्त होणे गरजेचे आहे, त्यासाठी समाजामध्ये संत साहित्याची ओळख व आवड निर्माण व्हायला हवी. यासाठी आध्यात्मिक ज्ञान आणि भारतीय संस्कृतींच्या विचारांचा प्रचार, प्रसार व प्रबोधनाच्या माध्यमातून गावागावात लोकांचे संघटन करून समाज हिताचे कार्य वारकरी सांप्रदायच्या माध्यमातून होत आहे.
समाजामध्ये एकमेकांविषयी आपुलकी , प्रेम, बंधुभाव प्रेरीत करून समृध्द, बलशाली भारत निर्माण व्हावा, प्रत्येक व्यक्ती देशभक्तीने प्रेरीत होवून समाजकार्य करेल असा आदर्श वारकरी घडावा या उद्देशाने महाराष्ट्र वारकरी महामंडळाने सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदाची जबाबदारी विश्वनाथ गवंडळकर यांच्याकडे दिली आहे.