विनोद पवार राजापूर : जैतापूर खाडीच्या पाण्याने चारही बाजूंनी वेढलेल्या गावालाही आता ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत. केवळ ७८ लोकसंख्या, ७१ मतदार आणि ग्रामपंचायतीचे सदस्य मात्र ७. खाडीच्या पाण्याने वेढलेल्या या ऐतिहासिक बेटावर २७ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. राज्यातील सर्वात लहान ग्रामपंचायत म्हणून जुवे जैतापूरचा उल्लेख होतो. विशेष म्हणजे याठिकाणी एकदाही निवडणूक घ्यावी लागलेली नाही, याठिकाणी सर्व जागा बिनविरोधच होतात.या अनोख्या गावचे क्षेत्र अवघे ४५ हेक्टर एवढे आहे. गावात ३५ घरे आहेत. नोकरीनिमित्त येथील अनेक तरूण स्थलांतरित झाले आहेत. येथील पारंपरिक असलेला शेतीव्यवसाय सोडून आता तेथील लोक उपजीविकेसाठी मासेमारीकडे वळले आहेत. येथील परंपराही इतर ठिकाणच्या मानाने भिन्न असल्याचे दिसून येते. गावात तीन मंदिरे असून त्यातील रवळनाथाची पालखी दर ५० वर्षांनी गावात भक्तभेटीसाठी निघते. येथील शाळेत केवळ दोन विद्यार्थी आहेत अन् १ शिक्षक आहे. गावात अंगणवाडी आहे, पण त्यामध्ये मुलेच नाहीत. गावात नळपाणी योजना तयार करण्यात आली आहे. ती बोअरिंगवर तयार करण्यात आल्याने त्याची पाणीपट्टी ग्रामस्थांवर आकारली जात नाहीत. बोअरिंगचा सर्व खर्च ग्रामपंचायतीने उचलला आहे. विशेष म्हणजे या गावाच्या चारही बाजूंना खाडी असली तरी गावातील विहिरींचे पाणी गोड आहे.
गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नाहीजुवे जैतापूर गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ताच नसल्याने या गावात कोणतेही वाहन येत नाही. या गावातील एकाही माणसाकडे वाहन नाही. केवळ होडीनेच ग्रामस्थांना बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवावा लागतो.
आतापर्यंत चार सरपंचआतापर्यंत या ग्रामपंचायतीला केवळ चारच सरपंच झाले आहेत. १९६९ साली या ग्रामपंचायतीची स्थापना झाली, त्यानंतर लक्ष्मण फडके २० वर्षे, अनंत सरपोळे हे ५ वर्षे, विश्वनाथ कांबळी १० वर्षे तर दर्शना सरपोळे हे १० वर्षे सरपंच राहिले आहेत. ग्रामपंचायतीचे एकूण उत्पन्न वार्षिक ३८ हजारच्या घरात आहे.
प्रचारालाही कुणी फिरकत नाही...जुवे-जैतापूर गावात केवळ ७१ मतदार आहेत. त्यामुळे विधानसभा असो वा लोकसभा, जिल्हा परिषद असो वा पंचायत समिती या भागाकडे सहसा कुणीच फिरकत नाही. केवळ ७१ मतदारांसाठी इकडे कोणता लोकप्रतिनिधी फिरकणार? असा सवाल ग्रामस्थ करू लागले आहेत.
संभाजी राजेंना सुरक्षित ठेवले?हे गाव ऐतिहासिक मानले जाते. संभाजी राजांना ज्यावेळी संगमेश्वरनजीक अटक करण्यात आली, त्यावेळी अटकेची चाहूल लागल्याने संभाजीराजांनी ताराराणीला राजापूर खाडीमार्गे सिंधुदुर्गात नेण्यास सांगितले. यावेळी सुरक्षित बेट म्हणून त्यांना जुवे जैतापूर येथे ठेवण्यात आले होते, असे येथील लोक आवर्जून सांगतात.
चार महिन्याचे धान्य एकदमप्रवास होडीतून करावा लागत असल्याने पावसाळ्यात बहुतांशवेळा गावातून कोणीही बाहेर पडत नाहीत. त्यामुळे या गावातील लोकांसाठीचे पावसाळ्याच्या चार महिन्यातील रेशनचे धान्य मे महिन्यातच दिले जाते. अनेक वर्षे याच पद्धतीने येथील काम सुरू आहे.