Video : आंबोली धबधब्याचे रौद्ररूप खूपच धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 10:08 PM2019-08-08T22:08:18+5:302019-08-08T22:27:40+5:30
घाट कोसळण्याची भीती : जैवविविधता आणि निसर्ग सौंदर्याची जपणूक हवी
- महेश सरनाईक
आंबोली (सिंधुदुर्ग)
पश्चिम घाटातील अतिशय मनमोहक निसर्ग सौंदर्याने नटलेले हिलस्टेशन म्हणजे आंबोली. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूत पर्यटकांसाठी हॉट डेस्टिनेशन म्हणून कायमच आंबोलीकडे पाहिले जाते. आंबोलीचा पाऊस तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा. त्यामुळे घाटातील धबधबा हा संपूर्ण महाराष्ट्र, गोवा आणि नजिकच्या कर्नाटक राज्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. गेले चार दिवस आंबोलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या संततधार पावसाने या धबधब्याचे अतिशय रौद्र रूप पहायला मिळाले आहे. ह्दययाचा ठोका चुकविणारा धबधब्याचा व्हिडीओ लोकमतच्या हाती लागला आहे. तो पाहिल्यावर अरे...बापरे...म्हणण्याची वेळ आपल्यावरही येईल.
आंबोलीत दरवर्षी वार्षिक साडेतीनशे ते चारशे इंच पाऊस पडतो. त्यामुळे आंबोलीला प्रती चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. अगदी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत हा पाऊस कधी कोसळेल हे काही सांगू शकत नाही. असे असताना आंबोलीचा पाऊस आजमावण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात. आंबोलीत राहतात, पर्यटनाचा आस्वाद घेतात.
ओळख टिकविण्याचे आव्हान
पक्षी, प्राणी, औषधी वनस्पतींचे माहेरघर म्हणून ही आंबोली परिचित आहे. पर्यावरण प्रेमी काका भिसे यांच्या सारखे प्राणिमित्र त्यांना आंबोलीत पर्यटन घडवितात. त्यामुळे भिसेंच्या मते आंबोलीची ही जैव विविधतेने संपन्न असलेली ओळख भविष्यात टिकवून ठेवण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे.
धोरणात्मक निर्णय हवे
मानवाच्या अतिक्रमणामुळे म्हणा किंवा दुर्लक्षामुळे पाच वर्षांपूर्वी आंबोली घाट कोसळला होता. त्यानंतर मात्र प्रशासनाने यातून काही धडा घेतला नाही. तात्पुरती मलमपट्टी केली. घाट बांधला पण काही धोरणात्मक निर्णय घेतले नाही. त्याचा परिणाम आता पावसाळ्यात पुन्हा घाट कोसळू लागला आहे.
खासगी कंपनीच्या केबल नेण्यासाठी घाट पोखरण्यात आला. त्याचा परिणाम आता घाट कोसळूही लागला आहे. त्यामुळे यावर निर्बंध कोण घालणार ? असा प्रश्न आहे.
धबधब्याचे रौद्र रूप कॅमेराबद्ध
आंबोलीत खूप पाऊस असतो. सहा महिने सूर्य दिसत नाही. दाट धुके असते. हे आपण सर्वांनी अनुभवले आहे. धबधबाही अनुभवला असेल. मात्र, एवढ्या मोठ्या आणि विध्वंसक रूपात तो पहिल्यांदाच कॅमेराबद्ध झाला आहे.