गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर पाणी; रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 05:38 PM2019-08-05T17:38:39+5:302019-08-05T17:40:23+5:30
गगनबावडा तालुक्यातील मांडकुली, किरवे, लोंघे या तीन ठिकाणी पुन्हा पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर शनिवारी सुरू करण्यात आलेली वाहतूक रविवारी दुपारपासून पुन्हा बंद होती. वाहतूक बंद झाल्याचा संदेश मिळेपर्यंत कित्येक वाहनांनी घाटरस्ता पार केला होता. त्या वाहनांना गगनबावड्यातून माघारी परतावे लागले. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे.
वैभववाडी : गगनबावडा तालुक्यातील मांडकुली, किरवे, लोंघे या तीन ठिकाणी पुन्हा पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर शनिवारी सुरू करण्यात आलेली वाहतूक रविवारी दुपारपासून पुन्हा बंद होती. वाहतूक बंद झाल्याचा संदेश मिळेपर्यंत कित्येक वाहनांनी घाटरस्ता पार केला होता. त्या वाहनांना गगनबावड्यातून माघारी परतावे लागले. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे.
घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. घाटमाथ्यावरील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्गदेखील सुरू आहे. त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी गगनबावडा तालुक्यातील तीन ठिकाणी रस्त्यावर आले आहे. दोन ते तीन फूट रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, बालिंगा पुलाला पाणी टेकल्याने गेल्या चार पाच दिवसांपासून या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतु दोन दिवसांपासून लहान वाहनांसाठी हा मार्ग खुला करण्यात आला होता. शनिवारपासून सरसकट वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र रविवारी पुन्हा रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली.
कोल्हापूर प्रशासनाकडून वाहतूक बंद केल्याचा संदेश सिंधुदुर्ग प्रशासनाकडे पोहोचेपर्यंत वैभववाडीकडून जाणाऱ्या अनेक वाहनांनी करूळ घाट पार केला होता. गगनबावड्यात या वाहनांना थांबवून पुन्हा माघारी पाठविण्यात आले. या मार्गावरील वाहतूक सध्या फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली. तालुक्यात वादळीवाऱ्यांसह पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे, झाडांचा फांद्या मोडून पडण्याचे प्रकार सुरू आहेत. वादळाचा जास्त फटका वीज वितरणला बसल्याने या भागातील वीजपुरवठा बंद होता.