नीतेश राणेंचा ‘स्वाभिमान’ आता गेला कुठे?--अतुल रावराणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 10:12 PM2017-09-22T22:12:04+5:302017-09-22T22:13:39+5:30
वैभववाडी : पक्षाने अन्याय केल्याचे स्पष्ट करीत पक्षसदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा देऊन नारायण राणे यांनी स्वाभिमान दाखवून दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैभववाडी : पक्षाने अन्याय केल्याचे स्पष्ट करीत पक्षसदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा देऊन नारायण राणे यांनी स्वाभिमान दाखवून दिला. त्यांच्या बरोबरच सर्व पदाधिका-यांनी राणेंसाठी आपली पदे सोडली. परंतु, राणेंच्या पुण्याईमुळे आमदार झालेले आणि त्यांना देव मानणा-या नीतेश राणेंनी पोटनिवडणुकीच्या भितीने वडीलांना अर्ध्यावर सोडून पळ काढला. मग राज्यात स्वत:ची संघटना चालवणा-या नीतेश राणेंचा 'स्वाभिमान' आता गेला कुठे? असा सवाल करीत धुंदीत कोण असते हे जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही दाखवून दिले आहे. तुम्हाला जी भाषा कळते त्याच भाषेत उत्तर देण्याची आपली तयारी आहे. त्यामुळे तोंड बंद करण्याची धमकी मला देऊ नका, असा टोला भाजपचे नेते अतुल रावराणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत लगावला.
येथील भाजप संपर्क कार्यालयात रावराणे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, बंडू मुंडल्ये, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, सरचिटणीस किशोर दळवी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडली. तेव्हा समर्थकांनी आमदारकीवर लाथ मारुन राणेंना साथ दिली. नंतर त्यातील काहीजण माघारी परतले. परंतु, त्यावेळी समर्थकांनी स्वार्थ न पाहता नेत्याला साथ दिली. मात्र, काँग्रेस पक्ष सोडल्याची राणेंनी घोषणा केली. तेव्हा त्यांचा आमदार मुलगा त्यांच्या सोबत नव्हता. हा त्यांच्या दोन पक्षांतरातील फरक आहे.
रावराणे म्हणाले की, अरेरावी आणि दुस-याला तुच्छ लेखण्याची नीतेश राणेंची पध्दत त्यांच्या भवितव्यासाठी अडचण ठरणारी आहे.
मी ६ वर्षांपुर्वी जिल्'ात सक्रिय झालो तो सर्वसामान्य जनतेचे अश्रु पुसण्यासाठी. माझ्यामागे कुणाचाही राजकीय वारसा नाही. समाजकार्य जोड म्हणून मी राजकारणात आलो. त्यामुळे मी कायम जमिनीवरच असतो. पोटनिवडणुकीला घाबरुन त्यांनी वडीलांसोबत आमदारकीचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवले नाही, असा आरोप रावराणेंनी केला.
नीतेश राणेंचे नाही; पक्षाचे काम करणार!
आमदार नीतेश राणे आणि अतुल रावराणे यांच्यात नेहमीच शाब्दिक खटके उडत आले आहेत. त्यामुळे राणे भाजपमध्ये आल्यावर पोटनिवडणुक लागली तर 'त्यांचे' काम करणार की नाही? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता 'आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत. नीतेश राणेंचे काम करणार नाही; तर पक्ष जो उमेदवार देईल त्याचे पक्षहितासाठी काम करु, कुणाचेही वैयक्तिक महत्त्व वाढविण्यापेक्षा पक्ष संघटन भक्कम करणे हाच आमचा सर्वांचा प्रयत्न राहणार आहे, असे रावराणे यांनी सांगितले.