सुधीर राणे कणकवली : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना आणि भाजपची युती होणारच , असे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अनेकवेळा जाहीरपणे सांगितले आहे . त्यामुळे कणकवली मतदारसंघात युतीचा उमेदवार कोण असणार ? याची उत्सुकता मतदारांसह कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे . त्याचबरोबर भाजप व शिवसेना युती झाली नाही तर त्यांचे उमेदवार कोण असतील ? अथवा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजप मध्ये विलीन झाला तर नेमकी काय स्थिती असेल याबाबतही सध्या कणकवली विधानसभा मतदार संघात तर्क वितर्क लढविले जात आहेत.विधानसभा निवडणुकीच्या अनुषगाणे कणकवली मतदारसंघातील विद्यमान आमदार नीतेश राणे यांनी 'सेकंड ईनिंग साठी ' जोरदार कंबर कसली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसच्यावतीने निवडणूक लढवून ते मोठ्या मताधिक्याने तत्कालीन आमदार प्रमोद जठार यांचा पराभव करून विजयी झाले होते. आता बदलत्या राजकीय समिकरणांनुसार ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून निवडणूक लढविणार की त्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनिकरण झाले तर भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढविणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.मात्र, असे जरी असले तरीही नितेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे . फेसबुक , व्हॉट्सअॅपवर त्यांच्या प्रचाराचे लेख आणि व्हिडिओ , त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने प्रसारीत केले जात आहेत . तर भाजपच्यावतीने कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर व अतुल रावराणे यांनीही मतदारसंघांत कार्यकत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू ठेवले आहे . छत्र्या, रेनकोट , टीशर्ट असे साहित्य मतदारापर्यंत पोचविल्यानंतर गणशोत्सवात शिधा सामग्री देखील मतदारापर्यंत पोच केली आहे .शिवसेना भाजप युतीच्या जागा वाटपात सिंधुदुर्गातील कणकवली विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आलेला आहे . तसेच युती होणारच या शक्यतेने शिवसेनेकडून कुणा उमेदवाराने दावेदारी केलेली नाही . तर भाजपमध्ये स्वाभिमान पक्ष विलीन न झाल्यास , या पक्षातील एक बडा नेता कणकवली मतदारसंघात भाजपचा उमेदवार म्हणून पुढे येईल अशीही चर्चा गेले काही दिवस रंगली आहे .कणकवली मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा बालेकिल्ला असल्याचे मानले जाते. या मतदारसंघातील कणकवलीसह वैभववाडी आणि देवगड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राणे समर्थकांचा वरचष्मा आहे . नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणकीत कणकवली मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे यांना युतीच्या विनायक राऊत यांच्यापेक्षा १०, ७३१ चे मताधिक्य मिळाले आहे .
त्याच पाठबळावर विद्यमान आमदार नीतेश राणे यांना या मतदारसंघात विजयाचा विश्वास आहे . मात्र त्यांच्यासमोर भाजप - शिवसेना युतीचा उमेदवार उभा राहिला आणि एकास एक लढत झाली तर खऱ्या अर्थाने चुरस होवू शकते याची कल्पना खुद्य राणेंना देखील आहे . त्यादृष्टीने त्यांनीही मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे .महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होईल आणि कणकवली मतदारसंघात नीतेश राणे हे भाजपचे उमेदवार असतील असाही अंदाज स्वाभिमान कार्यकत्यांकडून वर्तविण्यात येत आहे . तसे झाले तर भाजप - शिवसेना युतीचे नीतेश राणे हे उमेदवार असतील ; मात्र त्यांना शिवसैनिकांची किती साथ मिळेल ? हा खरा प्रश्न आहे.काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या पदाधिकाऱ्यांची चाचपणी केली असली तरी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. तसेच आघाडी करून दोन्ही पक्ष लढणार का ? हेही स्पष्ट केलेले नाही. तर मनसे, वंचीत बहुजन आघाडी , रिपब्लिकन पक्ष यांनीही आपली नेमकी भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे सध्या तरी कणकवली विधानसभा मतदार संघात कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार असणार याबाबत नेमका अंदाज बांधता येत नसल्याने मतदारांमध्ये सध्या तरी संभ्रमावस्था आहे.