पत्नीची आत्महत्या; पतीला आठ महिन्यांनंतर अटक, सावंतवाडीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 04:16 PM2019-08-03T16:16:13+5:302019-08-03T16:18:22+5:30
श्रमविहार कॉलनी येथे राहणाऱ्या वैष्णवी प्रसाद बांदेकर (३२) हिच्या आत्महत्याप्रकरणी तिचा पती प्रसाद धनंजय बांदेकर (३६) याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने तब्बल आठ महिन्यानंतर त्याला शुक्रवारी सायंकाळी सावंतवाडी पोलिसांनी अटक केली.
सावंतवाडी : श्रमविहार कॉलनी येथे राहणाऱ्या वैष्णवी प्रसाद बांदेकर (३२) हिच्या आत्महत्याप्रकरणी तिचा पती प्रसाद धनंजय बांदेकर (३६) याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने तब्बल आठ महिन्यानंतर त्याला शुक्रवारी सायंकाळी सावंतवाडी पोलिसांनी अटक केली.
१२ नोव्हेंबर २०१८ रोजी श्रमविहार येथील आपल्या राहत्या घरी वैष्णवी बांदेकर हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती प्रसाद बांदेकर, सासरा धनंजय बांदेकर व सासू शुभदा बांदेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तर आरोपी प्रसाद बांदेकर याने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉम्प्युटरही गायब केल्याप्रकरणी पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल केल्यानंतर तिघांनीही जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण पती आणि सासरे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता, उच्च न्यायालयाने सासरे धनंजय बांदेकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
मात्र, पती प्रसाद बांदेकर याचा जामीन नामंजूर करण्यात आल्यानंतर आज सावंतवाडी पोलिसांनी प्रसाद बांदेकर याला अटक केली आहे. त्याला शनिवारी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.