सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वाऱ्याचा जोर वाढला, देवबागात पडझड, मासेमारीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 03:28 PM2018-03-23T15:28:52+5:302018-03-23T15:28:52+5:30
सिंधुदुर्ग : मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गुरुवारी दिवसभर वाऱ्यांचा तडाखा बसला. समुद्रातही वाऱ्यांचा वेग वाढल्याने मोठमोठ्या लाटा किनाºयावर दुपारपर्यंत धडकत होत्या.
सिंधुदुर्ग : मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गुरुवारी दिवसभर वाऱ्यांचा तडाखा बसला. समुद्रातही वाऱ्यांचा वेग वाढल्याने मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर दुपारपर्यंत धडकत होत्या. किनारपट्टी भागात वाऱ्याने घातलेल्या थैमानात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. यात देवबाग-भाटकरवाडी येथील अरुण भाटकर यांच्या जागेतील माड कृष्णाजी मनोहर भाटकर यांच्या घरावर कोसळल्याने घराचे नुकसान झाले. सुदैवाने घरातील सदस्य बचावले. वादळी वाऱ्याचा परिणाम मासेमारी झाल्याचे सांगण्यात आले.
मालवणसह सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गुरुवारी सकाळपासून सोसाट्याचा वारा अनुभवायला मिळाला. समुद्राच्या लाटांचाही वेग वाढल्याने मासेमारी नौकांनी सुरक्षेच्यादृष्टीने किनारा गाठला होता. मात्र, याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाकडे वरिष्ठ कार्यालयाकडून कोणताही संदेश प्राप्त झाला नव्हता.
वाऱ्याचा जोर सायंकाळी काही प्रमाणात ओसरला. या वाऱ्याचा मासेमारीवर परिणाम झाला असला तरी पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला नाही. किल्ले सिंधुदुर्ग दर्शन घडविणारी किल्ला प्रवासी होडी वाहतूक दिवसभर विनाअडथळा सुरु होती, असे बंदर विभागाकडून सांगण्यात आले.
वीज वितरणकडून खबरदारी
मालवण शहरात दिवसभर सोसाट्याचा वारा वाहत असल्याने वीज वितरण कंपनीने खबरदारी घेतली होती. दुपारच्या सत्रात वीज वाहिन्यांवर माडाची झावळे व झाडाच्या फांद्याचा स्पर्श होत असल्याने स्पार्किंग होत होते. तसेच वारा असल्याने वीज वाहिन्यावर फांदी तुटून अपघात होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून वीज वितरणने वीज पुरवठा सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवला होता, असे वीज अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.