शिरगांव : देवगड तालुक्यातील ओंबळ-देऊळवाडी येथील प्रसाद प्रकाश आचरेकर (२५) या युवकाचे सर्पदंशामुळे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना बुधवारी पहाटे घडली.प्रसाद हा २८ रोजी मित्रांसमवेत ओंबळ काझरवाडी येथे जात असताना दुपारी २.३० च्या दरम्यान त्याला काझरवाडी रस्त्यावरील पुलाजवळ पायाला सर्पदंश झाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी गांवचे तंटामुक्ती अध्यक्ष राजनकुमार कदम यांना याची माहिती दिली.
राजनकुमार कदम यांनी तातडीने प्रसाद आचरेकर याला शिरगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू असतानाच त्याला उलट्या होऊ लागल्या. १०८ रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध होऊ न शकल्यामुळे शिरगांव येथील राजे ग्रुप या सामाजिक संस्थेच्या रुग्णवाहिकेने त्याला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने हलविले.२९ रोजी त्याची प्रकृती आणखीनच खालावल्याने अधिक उपचाराकरीता गोवा-बांबुळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३० आॅक्टोबर रोजी पहाटे प्रसाद आचरेकर याची प्राणज्योत मालवली.प्रसादने प्रतिकूल परिस्थितीत एमबीएपर्यंतचे शिक्षण मेहनतीने पूर्ण केल्यानंतर त्याने पाच-सहा महिन्यांपूर्वीच फणसगांव येथील वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीस सुरुवात केली होती. कायम हसतमुख व मनमिळावू स्वभावामुळे शिरगांव दशक्रोशीत त्याचा मोठा मित्रपरिवार होता.
त्याच्या निधनाचे वृत्त समजताच शिरगांव दशक्रोशीवर शोककळा पसरली. प्रसाद आचरेकर याच्यावर ओंबळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, भाऊ, चुलते असा परिवार आहे.