सावंतवाडी : आपल्या जीवनशैलीतून आपल्याला कोकण जपता आले पाहिजे. कोकणात येणारे विनाशकारी प्रकल्प रोखण्यासाठी युवकांनी एकत्र यायला हवे. कोकणाला बुद्धिमत्तेचा, विचारांचा वारसा लाभला असून त्याचा उपयोग करा असे आवाहन कोकणी रानमाणूस म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसाद गावडे यांनी केले. सावंतवाडी येथे शाश्वत कोकण परिषदेचे आयोजन येथील आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पर्यावरण अभ्यासक सत्यजित चव्हाण, मल्हार इंदुलकर, मंगेश चव्हाण, शशी सोनावणे, आदी उपस्थित होते.गावडे म्हणाले, कोकणातल्या युवकांची बुद्धिमत्ता प्रचंड आहे. परंतु आजचा युवक जेव्हा राजकारण्यांच्या मागे धावत आपला वेळ वाया घालवताना दिसतो तेव्हा वाईट वाटते. संघर्षाकडून समृद्धीकडे ही टॅगलाईन वापरून शाश्वत कोकण परिषदेचे आयोजन करण्यात आल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले. कोकणचे कोकण पण टिकावे असे मत त्यांनी व्यक्त केले. कोकण हे जगातील आजच्या घडीचं जगण्यासाठी चांगले ठिकाण आहे. केवळ आजी आजोबांचे कोकण आपल्याला ठेवायचं नाही. शेवटची पिढी ही सहानुभूती घेऊन कोकण वाचवायचं नाही. जी तरुण पिढी आता आहे तीच नवी पिढी आहे. शेवटच्या पिढीतील जीवनशैली आपल्याला स्वतःमध्ये उतरविली तरच शाश्वततेकडे जाऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने होत असलेला विकास डोक्यात ठेवून काम करायला पाहिजे. आपण फक्त माझा मी शाश्वत जगतो या मानसिकतेत राहता काम नये. आपल्या आजूबाजूचे कोकण जोपर्यंत उध्वस्त होत आहे तोपर्यंत आपण शाश्वत जीवनशैली जगू शकत नाही . त्यासाठी पहिल्यांदा आपल्या आजूबाजूच्या देवराई जपल्या गेल्या पाहिजेत असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.कोकणामध्ये येणारे जे विनाशकारी प्रकल्प असतील ते थांबवण्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. म्हणूनच कोकणची लोक संस्कृती, जीवनशैली बाबत जनजागृती करणारे कार्यक्रम भविष्यात या माध्यमातून राबवले जातील असा मानस प्रसाद गावडे यांनी यावेळी व्यक्त केला. या निमित्ताने शाश्वत कोकण चा विकास यावर मंगेश चव्हाण ,शशी सोनावणे यांनी ही आपले विचार व्यक्त केले.
कोकणातील विनाशकारी प्रकल्प रोखण्यासाठी युवकांनी एकत्र यायला हवे, रानमाणूस प्रसाद गावडे यांनी केले आवाहन
By अनंत खं.जाधव | Published: May 02, 2024 12:49 PM