चंदीगड: संपूर्ण आयुष्यात स्वत:चं असं काहीच केलं नाही, दोन पैसे स्वत:च्या हिमतीवर मिळवले नाहीत, याची खंत मनात असलेल्या एक आजी वयाच्या ९४ व्या वर्षी स्वत:चा व्यवसाय करत आहेत. चंदीगडमधल्या हरभजन कौर यांनी ४ वर्षांपूर्वी स्वत:चा व्यवसाय सुरू केला असून आता त्या अतिशय आत्मविश्वासानं उद्योगाचा पसारा सांभाळत आहेत. मुलीनं विचारलेल्या एका प्रश्नातून हरभजन यांचा 'गोड' प्रवास सुरू झाला. हरभजन तयार करत असलेल्या मिठाईची चव गेल्या चार वर्षांपासून कित्येकांनी चाखली आहे. हरभजन यांच्या कन्या रवीना सुरी यांनी चार वर्षांपूर्वी आईला आयुष्याबद्दल काही खंत वाटते का, असा प्रश्न केला. त्यावर माझं आयुष्य अतिशय सुंदर गेलं. मात्र स्वत:च्या हिमतीवर एकही पैसा कमावला नाही, याची सल वाटते, अशी भावना हरभजन यांनी व्यक्त केली. त्यानंतर रवीना यांनी हरभजन यांना स्टार्ट अप सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. हरभजन यांच्या व्यवसायाला इथूनच सुरुवात झाली. मुलांना, नातवंडांना, नातेवाईकांना आयुष्यभर खाऊ घातलेली बेसनाची बर्फी, विविध प्रकारची लोणची तयार करून विकण्याचं हरभजन यांनी ठरवलं आणि त्यांचा स्वत:चा व्यवसाय सुरू झाला. कायम घरात राहणारी एक महिला ते एक बिझनेसवूमन हा हरभजन यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी असल्याचं रवीना यांनी सांगितलं. 'आईनं संपूर्ण आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट घेतले. ती अतिशय उत्तम स्वयंपाक करते. त्यामुळे मिठाई, सरबत यांच्यासारखे पदार्थदेखील आई घरीच करायची. वयाच्या ९० व्या वर्षी एका स्थानिक बाजारात तिनं मिठाई विकण्यास सुरुवात केली. त्यासाठी ती स्वत: बाजारात गेली. ग्राहकांशी बोलली आणि मिठाई विकून तिला २ हजार रुपये मिळाले. आईची ती पहिली कमाई होती,' अशा शब्दांत रवीना यांनी त्यांच्या आईचा गृहिणी ते उद्योजिका असा प्रवास उलगडून सांगितला. हरभजन यांना व्यावसायिक यश मिळालं का, या प्रश्नाला रवीना यांनी थोडं वेगळं उत्तर दिलं. आईला मिळालेलं यश पैशात मोजता येणार नाही. कारण या व्यवसायानं तिला प्रचंड आत्मविश्वास दिला आहे. लाजाळू स्वभाव असल्यानं संपूर्ण वेळ घरात बसणारी, चारचौघांत फारशी न मिसळणारी एक महिला थेट बाजारात जाते. व्यवसाय करते. मिठाई, लोणच्यांच्या चवींबद्दल ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेते. आईमध्ये झालेला हा बदल थक्क करणारा असल्याचं रवीना यांनी सांगितलं.
आजीबाईंची बातच न्यारी; नव्वदीत व्यवसाय सुरू करून घेतली भरारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 11:49 AM