Social Viral : हल्ली सोशल मीडिया प्रत्येकाच्याच जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सोशल मीडियावर केव्हा काय बघायला मिळेल सांगता येत नाही. सध्या 'Blinkit'च्या वेबसाईटवर एका महिलेने कंपनीचे सीईओ अलबिंदर ढिंडसा यांना विचारलेल्या प्रश्नाची जबरदस्त चर्चा सुरू आहे.
सोशल मीडियावर 'Blinkit' चे सीईओ अलबिंदर ढिंडसा यांच्या विरोधात एका व्यक्तीने केलेली कम्प्लेंट चर्चेचा विषय बनली आहे. या तक्रारदार नेटकऱ्याच्या आईचे म्हणणे आहे की, ऑनलाईन साईट्सवर भाजी खरेदी केल्यानंतर कोथिबींर फ्री का दिली जात नाही? यावर 'Blinkit' च्या सीईओंनी भन्नाट उत्तर दिलं आहे.
आपल्याकडे महिला बाजारात भाजी खरेदीसाठी गेल्यानंतर दुकानदाराकडून मोफत कोथिबींर तसेच मिरचीही मिळवतात. तुम्हीही असे प्रकार बघितले असतील. काही लोक तर जो भाजीवाला फ्री-मध्ये मिरची कोथिबींर देत नाही, त्याच्या दुकानात जाणंच टाळतात. आजच्या ऑनलाईनच्या युगात जेवढं मागाल तेवढंच मिळेल. ना एक रुपया कमी ना एक रुपया जास्त. त्याला ही पोस्ट अपवाद ठरली आहे.
संबंधित महिलेचं म्हणणं होतं की, या एकाच ऑनलाईन साईटवर सगळी भाजी खरेदी केल्यानंतर त्यावर मोफत कोथिबींर दिली जात नाही. यावर कंपनीच्या सीईंनी मजेशीर उत्तर दिलं. "कृपया, सर्व लोकांनी अंकितच्या आईचे आभार मानायला पाहिजे. येत्या काही दिवसांत आम्ही यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू." अलबिंदर ढींडसा यांच्या या खुसखुशीत उत्तराने नेटकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला आहे. आता या पुढे 'Blinkit' वर भाज्या खरेदी केल्यास त्यावर मोफत कोथिंबीर देण्यात येईल असं आश्वासन कंपनीच्या सीईओंनी दिल्याचं सांगितल जातंय.
अलबिंदर ढींडसा यांनी स्वत: च्या एक्स अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करत ग्राहकांना माहिती दिली आहे. या पोस्टवर एक यूजर कमेंट करत म्हणतो, "कोथिबींर देत आहात तर आता त्यावर दोन-चार मिरच्याही देऊन टाका." तसेच आणखी एकाने कमेंट केली आहे, "लवकरात लवकर मागणी मान्य केल्याबद्दल धन्यवाद! "