उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आपल्या लेकीचा घटस्फोट झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिला वाजत-गाजत घरी आणलं आहे. या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. निराला नगर येथे राहणारे अनिल कुमार हे पूर्वी बीएसएनएलमध्ये काम करायचे मात्र आता ते निवृत्त झाले आहेत. त्यांनी आपली एकुलती एक मुलगी उर्वी हिचं शहरातील चकेरी विमान नगर येथे 31 जानेवारी 2016 रोजी मोठ्या थाटामाटात आशिष रंजनसोबत लग्न लावून दिलं.
मुलगी उर्वी दिल्लीतील पालम एअरपोर्टवर काम करते. उर्वी इंजिनियर आहे आणि तिचा नवरा आशिष देखील इंजिनियर आहे आणि तो देखील दिल्लीत काम करतो. उर्वीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर दोघेही दिल्लीत राहू लागले. लग्नानंतर सासरच्यांनी जास्त हुंड्याची मागणी करण्यास सुरुवात केली आणि मुलीला तिच्या दिसण्यावरून टोमणेही मारल्याचा आरोप आहे.
अनिल कुमार यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या मुलीचं सुरक्षित भविष्य लक्षात घेऊन त्यांनी दिल्लीत एक फ्लॅट खरेदी केला पण जावयाला त्याच्या नावावर करायचा होता. 2019 मध्ये उर्वीने एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर तिला मुलगी का झाली आणि मुलगा हवा म्हणून आणखी टोमणे मारायला लागले. हळूहळू सासरच्यांनी आणि आशिषने मुलगी आणि उर्वीपासून अंतर ठेवले आणि दोघेही पती-पत्नी वेगळे राहू लागले आणि अंतर वाढत गेल्याने त्यांनी कोर्टात घटस्फोटासाठी दावा केला.
यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. उर्वीच्या कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आले आणि सासरच्या घरी पोहोचले. घरातील सदस्य ढोल-ताशांसह उर्वीच्या सासरच्या घरी पोहोचले. जिथून उर्वीला ढोल-ताशांसह तिच्या माहेरच्या घरी परत आणण्यात आणलं. सर्वजण या कृतीचं कौतुक करत असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.