उन्हाळा सुरु झाला की पहाटे आणि रात्री भटकी कुत्री मागे लागण्याचे प्रकार सर्रास पहायला मिळतात. रात्रीच्या वेळी दुचाकींच्या मागे भटकी कुत्री लागल्याने अनेक अपघात घडले आहेत. काहींचे अशा अपघातांमध्ये जीव देखील गेले आहेत. परंतु कुत्री वाहनांच्या मागे धावण्याच्या मागे एक वैज्ञानिक कारण आहे. त्यामुळे कुत्री वाहनांच्या मागे लागत असतात.
भटकी कुत्री आपला परिसर निश्चित करत असतात. त्यांच्या परिसरात एखादे दुसरे कुत्रे आले तर ते त्याच्यावर तुटून पडतात. कुत्री आपल्या परिसरातील वाहनांवर टाॅयलेट करुन आपला परिसर ठरवत असतात. कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता अधिक असते. अशावेळी एखाद्या दुसऱ्या भागातील गाडी त्यांच्या भागात आल्यानंतर त्यांना दुसऱ्या भागातील कुत्रे आल्याचे वाटते. त्याला आपल्या परिसरातून पळवून लावण्यासाठी ते वाहनांच्या मागे धावतात. असे प्रकार सहसा पहाटे आणि रात्रीच्या वेळी घडतात. दिवसा असे प्रकार फारसे घडत नाहीत.
त्याचबराेबर एखाद्या गाडीच्या धडकेत त्यांच्या साेबतच्या एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला असेल तर त्या प्रकारचे वाहन कुत्री लक्षात ठेवतात. असे वाहन त्यांच्या भागात आल्यानंतर ती कुत्री त्या वाहनाच्या मागे लागतात. दरम्यान सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून ही कुत्री रात्रीच्यावेळी गटाने नागरिकांवर हल्ले करत आहेत. त्याचबराेबर मैदानावर खेळत असणाऱ्या लहान मुलांच्या मागे देखील ही कुत्री लागत असल्याने पाल्याची सुरक्षा हा पालकांच्या चिंतेचा विषय झाला आहे.