संगीत शिकणे हे कोणत्याही साधनेपेक्षा कमी नसतं. मोठमोठे या साधनेपुढे फिके पडतात. पण चेन्नईच्या एका १३ वर्षीय पियानोवादक लिडियन नादस्वरम याने संगीत साधनेच्या माध्यमातून जगभरात आपलं नाव मानाने मोठं केलं आहे. गेल्या गुरूवारी लिदियनने अमेरिकन रिअॅलिटी शो 'द वर्ल्ड्स बेस्ट' चा किताब आपल्या नावावर केला. त्याला यासाठी बक्षिस म्हणून १ मिलियन डॉलर म्हणजे ६.९ कोटी रूपये मिळाले.
लिडियन चेन्नईच्या KM Music Conservatory चा विद्यार्थी आहे. या संस्थेची स्थापना प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांनी केली आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, या शोमध्ये लिडियनने निकोलाई रिमस्की-कोर्साकोवची 'द फ्लाइट ऑफ द बंम्बल्बी'ची ट्यून अशी काही सादर केली की, हॉलमधील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
लिडियनचे वडील संगीतकार आहेत. आणि त्यांनी मुलासोबत हा पुरस्कार मिळवला आहे. लिडियन ४ वर्षांचा असतानापासून पियानो वादन करतो. तो म्हणाला की, 'मला जगातला सर्वात चांगला पियानो वादक व्हायचं आहे. मला चंद्रावर जायचं आहे आणि बीथोवेन मूनलाइट सोनाटा खेळायचं आहे'. तसेच त्याला भावनिक सिनेमांसाठी संगीत द्यायचं आहे.
या शोच्या अंतिम सोहळ्यात लिडियनने दोन पियानोवर मेडली ट्यून एकत्र सादर करून ८४ गुण मिळवले. तर ६३ गुण मिळवून दक्षिण कोरियाचा कुक्कीवॉन हा रनर-अप राहिला. लिडियनबाबत ए.आर.रहमान यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केलं आहे.
लिडियन हा नुकताच 'द एलेन डीजेनरेस शो' मध्येही दिसला होता. यावेळी त्याने सांगितले होते की, तो दोन पियानोवर वेगवेगळ्या ट्यून वाजवू शकतो. त्याने ते करून दाखवलं आणि सोशल मीडियात त्याची एकच चर्चा रंगली होती. यावेळी त्याने डोळ्यांवर पट्टी बांधून पियानो वाजवला होता.