चेन्नईमधला एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडलेलं एक सात महिन्यांचं बाळ दुसऱ्या मजल्यावर अडकलं. चिमुकल्याला वाचवण्यासाठी कशी धडपड करण्यात आली हे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा काळजात चर्र करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चिमुकला चौथ्या मजल्यावरून खाली पडल्यावर दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतील प्लॅस्टिकच्या शीटमध्ये अडकला.
अवघ्या सात महिन्यांचं बाळ पडलेलं पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. त्याला वाचवण्यासाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मुलाला नेमकं कसं वाचवलं हे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. काही लोक इमारतीखाली बेडशीट घेऊन उभे असतात. तर काही लोकांनी पहिल्या मजल्यावरच्या खिडकीवर चढून, संघर्ष करून चिमुल्याचा जीव वाचवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवाडी येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील लहान मुलगा चौथ्या मजल्यावरून खाली पडला. यानंतर एकच खळबळ उडाली. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी काही लोकांनी अपार्टमेंटच्या खाली उभे राहून मुलाला वाचवण्यासाठी बेडशीट धरली, जेणेकरून मुलगा खाली पडल्यास तो बेडशीटवरच पडेल.
याच दरम्यान, पहिल्या मजल्यावर राहणारे शेजारी खिडकीतून बाहेर आले आणि सुमारे 2 मिनिटांच्या संघर्षानंतर मुलाचा जीव वाचवला. यावेळी समोरच्या इमारतीत राहणाऱ्या लोकांनी ही संपूर्ण घटना आपल्या फोनमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केली. सध्या सर्वत्र याच व्हिडीओची चर्चा रंगली आहे.