कोरोना काळात अनेकांना गंभीर प्रसंगाना तोंड द्यावं लागलं. कोरोनाची माहामारी नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील इतर देशांप्रमाणेच भारतातही लॉकडाऊन करण्यात आलं. प्रवासी मजूर, आपल्या घरापासून लांब असलेल्या लोकांना प्रचंड त्रासाचा सामना करत आपलं घरं गाठावं लागलं. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये वाहतुकीची साधनं उपलब्ध नसल्यानं आपल्या मुलाला परिक्षाकेंद्रावर घेऊन जाण्यासाठी वडिलांनी तब्बल १०५ किमीचा प्रवास सायकलनं केला. अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे.
झारखंडच्या गढवा जिल्ह्यात एका ६० वर्षीय माणूस आपल्या १०५ वर्षीय आईला घेऊन बँकेत जायला निघाला होता. विशेष म्हणजे वयोवृद्ध आईला चालता येत नसल्यानं आईला पाठीवर बसवून चालत संपूर्ण रस्ता या माणसानं पार केला आहे. या मायलेकाचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
द हिंदूच्या रिपोर्टनुसार ही घटना सोमवारी गढवा जिल्ह्यातील रांकामध्ये घडली आहे. ब्लॉक एडमिनिस्ट्रेशनद्वारे रांकामध्ये वनांचल ग्रामीण बँकेच्या बाहेर कोविड १९ चाचणीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. या टेस्टमध्ये निगेटिव्ह येत असलेल्या लोकांनाच बँकेत प्रवेश मिळत होता. सदर घटनेतील व्यक्तीने सांगितले की, ''मी माझ्या आईला घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा टेस्ट केल्या जात होत्या. काही कारणामुळे मी आईची टेस्ट करून घेऊ शकलो नाही. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी आत जाण्यापासून आम्हाला अडवलं. बिल्डींगमध्ये प्रवेश करू दिला नाही .''
६० वर्षीय मजूर बिफन भूयान याने दावा केला आहे की,'' माझ्या १०५ वर्षीय आईला बँकेत नेण्यासाठी कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं. म्हणून ४ किलोमीटर लांब पाठीवर बसवून आईला बँकेत घेऊन यावं लागलं. अकाऊंटमधून पेंशनचे पैसे काढण्यासाठी आईला बँकेत आणावं लागलं. ''
बिफन भूयान यांच्या आईच्या बँकेच्या खात्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत तीन महिन्यांची पेंशन जमा झाली होती. जमा झालेली रक्कम १५०० रुपये होती. पण कोविड टेस्ट न केल्यामुळे बँकेत जाण्यास मनाई करण्यात आली. नाईलाजानं रिकाम्या हातानं या मायलेकाला घरी परतावं लागलं. माध्यमांपर्यंत ही घटना पोहोचल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली.
मुख्यमंत्री हेमंत सारेन यांनी सदर वयस्कर महिलेची मदत करण्याचे स्थानिक प्रशासनाला आदेश दिले. तसंच भविष्यकाळात वयस्कर लोकांना अशा समस्यांचा सामना करावा लागू नये असे सांगण्यात आले. त्यानंतर मंगळवारी बँकेचे मॅनेजर भूयान यांच्या घरी पोहोचले आणि पेन्शनची १५०० रुपये रक्कम त्यांच्याकडे सुपूर्त केली. यापुढे त्यांना बँकेत येण्याची गरज पडू नये. तसंच जवळच्या ग्राहक सेवा केंद्रातून पेंशन मिळेल अशी व्यवस्था केली.
हे पण वाचा-
लय भारी! स्वतःचे दागिने विकून 'ती'नं जिम उघडली; अन् काही दिवसात जगप्रसिद्ध झाली, थक्क करणारा प्रवास
धक्कादायक! ऑपरेशन झाल्यावर महिलेच्या पोटात टॉवेल विसरून डॉक्टरने लावले टाके आणि.....