सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी केला जातो तसा गैरवापरही अनेकदा होताना दिसतो, फेक बातम्या, फोटो, व्हिडीओ नेटिझन्स फॉरवर्ड करत असतात. त्यातील मजकूर कितपत खरा याची कोणीही पडताळणी करत नाही. सध्या सोशल मीडियात असाच एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात महाराष्ट्र सरकारने पेंग्विनच्या इमोजीवर बंदी आणली आहे असा दावा केला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या या ब्रेकिंगसोबत ANI नावाच्या ट्विटर हँडलचा वापर स्क्रीनशॉट शेअर केला जात आहे. या ट्विटमध्ये ब्रेकिंग न्यूज अपडेट देत दावा केला आहे की, महाराष्ट्र सरकारने पेंग्विनच्या इमोजीवर बंदी आणली आहे. सोशल मीडियात युजर्स मोठ्या प्रमाणात याचे स्क्रीनशॉट व्हायरल करत आहेत आणि सरकारकडे आता हेच काम उरलं आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
सुशांत राजपूत प्रकरणात पेंग्विन इमोजी वापरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. अनेक युजर्स कोणतीही खातरजमा न करता हा स्क्रीनशॉट खरा मानून व्हायरल करत आहेत. ३१ जुलै २०२० रोजी अभिनेत्री कंगना रणौत हिने सुशांत प्रकरणात एक ट्विट केले. त्यात तिने तिच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं. जागतिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा मुलगा, ज्याला बेबी पेंग्विन बोललं जातं असं ट्विट करत नाव न घेता आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले होते, त्यानंतर ट्विटरवर बेबी पेंग्विन ट्रेंड होऊ लागलं.
मात्र या फोटोबाबत पडताळणी केली असता ANI नावावर जे ट्विट व्हायरल होत आहे, त्याचं संपूर्ण युजर नेम @ANIparodyy असं आहे. तर ANI चं अधिकृत ट्विटर हँडल @ANI या नावाने आहे, ज्याला अधिकृतपणे ट्विटरकडून ब्ल्यू टीक देण्यात आली आहे. ANI ही राष्ट्रीय स्तरीय खासगी न्यूज एजेन्सी आहे, जी बातमी पुरवण्याचं काम करते. त्यामुळे व्हायरल होणारा फोटो ANI च्या नावाने बनावट हँडल असून अशाप्रकारे लोकांची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल होत असल्याचं दिसून येते.