VIDEO: उत्तर प्रदेशच्या रस्त्यावर 'आईन्स्टाईन' दिसला; तुफान हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 11:04 AM2021-02-23T11:04:26+5:302021-02-23T11:13:28+5:30
बागपतच्या मुख्य मंडईत दोन दुकानदारांमध्ये वाद; दोन गटांमध्ये जबर हाणामारी
एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेश बाबू, हा प्रसिद्ध डायलॉग तुम्ही ऐकला असेल. पण उत्तर प्रदेशातल्या बागपतमध्ये घडलेला प्रकार पाहून तुम्ही कदाचित 'एक प्लेट चाट की किमत तुम क्या जानो' असं म्हणाल. कारण एका चाटवरून बागपतमधील एका मंडईत अगदी फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. दोन दुकानदारांमध्ये झालेल्या हाणामारीत नंतर अनेकांची एंट्री झाली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं. बागपतच्या मंडईतील हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बागपतमधील बडौत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दोन चाट दुकानदारांचा सोमवारी वाद झाला. एका दुकानदारानं दुसऱ्या दुकानात जाणाऱ्या ग्राहकाला स्वत:कडे बोलावल्यानं वादाला सुरुवात झाली. त्यानंतर परिसराचं रुपांतर युद्धभूमीत झालं. या संपूर्ण हाणामारीत प्रमुख भूमिकेत दिसलेल्या काकांच्या हेअर स्टाईलची तुलना अनेकांनी विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनच्या हेअर स्टाईलशी केली आहे.
WWE Baghpat (UP)
— (((7ru7h))) (@7ru7h_1) February 22, 2021
pic.twitter.com/hduCSMSwmy
शाब्दिक वादाचं रुपांतर हाणामारीत होताच दोन्ही गट एकमेकांवर लाठ्या, काठ्या घेऊन तुटून पडले. दोन्ही गटांनी तुफान हल्ला चढवला. या हाणामारीच्या व्हिडीओमध्ये हिरव्या रंगाचा कुर्ता घातलेली आणि मोठे केस असलेली एक व्यक्ती दिसत आहे. त्यांनी अनेकांची धुलाई केली आहे. काही जणांनी त्यांनादेखील मारहाण केली आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीच्या हेअर स्टाईलची जोरदार चर्चा झाली. या व्यक्तीचं नाव हरेंद्र आहे.
हरेंद्र बागपतच्या मुख्य मंडईत चाटचं दुकान चालवतात. त्यांचं दुकान ४०-५० वर्षे जुनं आहे. 'एक-दोन महिन्यांपूर्वी माझ्या दुकानासमोर आणखी एक चाटचं दुकान सुरू झालं. माझ्या दुकानात शिळ्या पदार्थांपासून चाट तयार केला जातो, असं सांगून समोरचा दुकानदार ग्राहकांना स्वत:च्या दुकानात नेतो. याला मी विरोध करताच समोरील दुकानदार मारहाण करतो,' असं हरेंद्र यांनी सांगितलं.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हरेंद्र यांच्यासह ८ जणांना ताब्यात घेतलं. सोशल मीडियावर हरेंद्र यांच्या 'आईन्स्टाईन लूक'ची चर्चा आहे. याबद्दल विचारणा केली असता आपण साईबाबांचे भक्त असून दररोज साईबाबांची पूजा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन वर्षांतून एकदाच केस कापतो. हरिद्वारला जाऊन केसांना कात्री लावतो, अशी माहिती हरेंद्र यांनी दिली.