हत्तीचं पिल्लू चिखलात अडकलं, मुलीनी अशी केली मदत अन् 'छोटा हाती'चं मन जिंकलं! पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 02:51 PM2022-10-29T14:51:33+5:302022-10-29T14:52:54+5:30
एखाद्या गरजवंताला मदत करणं हे सर्वात पुण्यकार्य मानलं जातं. त्यात जर एखादा अडचणीत असेल आणि तुम्ही त्याच्या मदतीसाठी धावून ...
एखाद्या गरजवंताला मदत करणं हे सर्वात पुण्यकार्य मानलं जातं. त्यात जर एखादा अडचणीत असेल आणि तुम्ही त्याच्या मदतीसाठी धावून गेलात तर यापेक्षा चांगलं काम असूच शकत नाही. सध्याचा जगात लोक स्वत:च्याच कामात इतके गुंतलेले असतात की आजूबाजूचं जग दिसेनासं होतं आणि मदतकार्यासाठीही वेळ काढावा लागतो की काय अशी अवस्था झाली आहे. माणसं माणसांची मदत करत नाहीत. मग मुक्या प्राण्यांना मदत करण्याचं तर विचारच करू नका. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुमचे मन नक्कीच आनंदी होईल.
व्हिडिओमध्ये एक मुलगी एका छोट्या हत्तीला मदत करताना दिसत आहे. हत्तीचे पिल्लू संकटात सापडले आणि मुलीने त्याला चिखलातून बाहेर काढण्यास मदत केली. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकार लक्षात येईल. एक हत्तीचं पिल्लू रस्त्याच्या कडेला चिखलात अडकलं होतं. ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं, पण बाहेर पडू शकलं नाही. अशा स्थितीत एक मुलगी त्याचा पाय पकडून ओढताना दिसली. जेणेकरून हत्तीला चिखलातून बाहेर येण्यास मदत होईल. अखेर मुलीची मेहनत फळाला आली आणि हत्ती चिखलातून बाहेर आला. विशेष म्हणजे बाहेर येताच हत्तीनंही त्याची सोंड उंचावून तिचे आभार मानले.
She helped the elephant baby to come out from the mud it was struck in. Baby acknowledges with a blessing 💕 pic.twitter.com/HeDmdeKLNm
— Susanta Nanda IFS (@susantananda3) October 27, 2022
हत्तीचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये त्या मुलीने हत्तीच्या बाळाला चिखलातून बाहेर काढण्यास मदत केली असे लिहिले आहे. ३६ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत ८४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर ६ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केलं आहे.