कोरोनामुळे वैयक्तिक आयुष्यात खूप बदल झालेत. प्रत्येकाचं आयुष्यच बदलून गेलं आहे. खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते अगदी सॅनिटायझर, मास्कचा वापर याबाबतची काळजी असं सारंकाही बदललंय. सण, समारंभात जाणं आणि साजरं करण्यावरही निर्बंध आलेत. एकमेकांच्या घरी जाणं खूप कमी झालंय. खासकरुन लग्नसमारंभावरही खूप निर्बंध आले आणि अनेक गोष्टी परिस्थितीनुरूप बदलल्या आहेत. उत्तम वधू किंवा वर मिळविण्यासाठी वृत्तपत्रात छापण्यात येत असलेल्या मॅट्रोमोनी जाहिरातील तुम्ही याआधीही वाचल्या असतीलच. त्यात वधू किंवा वर कसा हवा याबाबतच्या काही अटी नमूद केलेल्या असतात. पण सद्या एक आगळीवेगळी मॅट्रोमोनी जाहिरात व्हायरल झाली आहे.
वधू पक्षानं सुयोग्य वरासाठी जाहिरातीत नमूद केलेल्या अटींमध्ये पहिलीच अट कोव्हीशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेला वर हवा, अशी घातली आहे. यात वधूनंही कोव्हीशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर ही आगळीवेगळी मॅट्रोमोनी जाहिरात तुफान व्हायरल होत असून काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही या जाहिरातीची दखल घेतली आहे. त्यांनी ही जाहिरात ट्विट करुन मजेदार कॅप्शन देखील दिलं आहे. "लसीकरण झालेला नवरदेव हवाय. लग्नाचं गिफ्ट हे एक बुस्टर डोस असावं यात कोणतंच दुमत नाही. हे आपल्यासाठी आता न्यू नॉर्मल होत आहे", असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे काहींनी ही जाहिरात खोटी असल्याचंही म्हटलं आहे. जाहिरात खोटी असो किंवा खरी यामागची आयडियाची कल्पना मात्र सोशल मीडियात हिट ठरली आहे एवढं मात्र नक्की!