Teacher turns Food Delivery Boy: झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या अनेक स्टोरी सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. यातील काही स्टोरी खूपच प्रेरणादायक तर काही स्टोरी मनाला चटका लावणाऱ्या असतात. अशाच एका कहाणीची सध्या चर्चा होत आहे. यात एक शिक्षक डिलिव्हरी बॉयचं काम करत असल्याचं समोर आलं. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, शिक्षक असूनही डिलिव्हरी बॉयचं काम का करतात? चला जाणून घेऊ याचं उत्तर...
कोरोना महामारीनंतर बिहारच्या भागलपूरमध्ये कुमार परिवारात आनंदाचं वातावरण होतं. कारण परिवारातील सगळ्यात मोठा मुलगा अमित कुमार याना सरकारी नोकरी लागली. आता ते सरकारी शिक्षक आहे. अमित कुमार याना पार्ट टाइम शिक्षक म्हणून नोकरी मिळाली होती. ज्यासाठी त्याना ८ हजार रूपये मिळत होते. जे घर चालवण्यासाठी कमीच होते.
पार्ट टाइम शिक्षक असूनही अमित कुमार यानी फुल टाइम काम केलं. मुलांना खेळांमध्ये भाग घेण्यासाठी प्रेरित केलं. अमित कुमार म्हणाले की, "अडीच वर्षानंतरही पगारात काही बदल झाला नाही. सरकार पात्रता परीक्षाही घेत नाहीये. शाळेतील इतर शिक्षकांना ४२ हजार रूपये पगार मिळतो. जो माझ्या पगारापेक्षा पाच पटीने जास्त आहे".
डिलिव्हरी बॉय बनण्याचं कारण
या वर्षाच्या सुरूवातीला अमित कुमार आणि दुसऱ्या पार्ट टाइम शिक्षकांना चार महिन्यांचा पगार मिळाला नव्हता. ज्यामुळे त्यांना मित्रांकडून पैसे उधार घ्यावे लागले. जसजसी लोनची रक्कम वाढत गेली, त्यांच्या आर्थिक समस्या वाढत गेल्या.
आपल्या पत्नीच्या सल्ल्याने अमित यांनी फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोवर स्वत:ला डिलिव्हरी पर्सन म्हणून रजिस्टर करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की, "मी फूड डिलिव्हरी पर्सनच्या कामाबाबत माहिती घेतली आणि मला आढळलं की, या कामासाठी ठराविक अशी काही वेळ नसते. मी लगेच रजिस्टर केलं आणि काम सुरू केलं. मी सकाळी मुलांना शिकवतो आणि सायंकाळी ५ ते १ वाजेपर्यंत डिलिव्हरीचं दुसरं काम करतो".
आधी अमित एका खाजगी शाळेत काम करत होते. पण कोविड १९ महामारीने त्यांची नोकरी गेली. २०१९ मध्ये त्यांनी सरकारी परीक्षा दिली आणि १०० पैकी ७४ गुण मिळवले. नंतर त्यांना २०२२ मध्ये नोकरी मिळाली.
अमित म्हणाले की, "माझ्याकडे ८ हजार रूपये आहे. त्यामुळे इतक्या पैशात घर चालवणं अवघड आहे. मी स्वत:च पोट भरू शकत नाही तर घरातील लोकांचं कसं भरणार? माझ्या घरात एक आई आहे. तिची काळजी घ्यायची आहे. अशात मला दोन काम करण्याशिवाय पर्याय नव्हता".