Raghavji Patel, Liquor Viral Video: जागतिक आदिवासी दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली. नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथे आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात राज्याचे कृषिमंत्री राघवजी पटेल यांच्यासह अन्य नेते आणि अधिकारी उपस्थित होते. या दरम्यान, आदिवासी चालीरीतींबाबत अनभिज्ञ असलेल्या मंत्र्यांनी चुकून चरणामृत समजून दारू प्यायली. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कृषी मंत्री राघवजी पटेल यांनी या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आदिवासी चालीरीतींबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगून चुकून दारू प्यायलाचे सांगितले. नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाड येथे आदिवासी परंपरेनुसार पूजेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, पुजाऱ्याने विशेष कारणास्तव उपस्थित मान्यवरांच्या हातातील पत्रावळीत थोडी-थोडी देशी दारू ओतली. कृषिमंत्र्यांनाही थोडी दारू पत्रावळीवर देण्यात आली. त्या पुढे काय करायचे असते, याची त्यांनी कल्पना नव्हती. आदिवासी परंपरांबद्दल अनभिज्ञ असलेल्या राघवजी पटेलांनी ते अमृत किंवा तीर्थ समजून प्यायला सुरूवात केली. तितक्यात त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीने मंत्र्याला सांगितले की हे पृथ्वी मातेला अर्पण करायचे आहे. तेव्हा मंत्री राघवजी पटेल यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी तसे केले.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
डेडियापाडा येथील जागतिक आदिवासी दिनाच्या सोहळ्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. आदिवासी दिनाच्या पूजेसाठी हिरव्या बाटलीत देशी दारू आणण्यात आली. नंतर, या बाटलीतून थोडेसे मद्य पृथ्वी मातेला देण्यासाठी पाहुण्यांना देण्यात आले. मंत्र्याने ते चरणामृत समजून प्यायले. कृषिमंत्र्यांच्या चुकीवर सारेच थोडेसे हसले. आदिवासी परंपरेत फेणी काढण्याची व पृथ्वीला अर्पण करण्याची प्रथा आहे. आदिवासी समाजातील लोक पूजेत त्याचा वापर करतात. त्यामुळे तसे करण्यात आले होते.
मंत्र्यांचे स्पष्टीकरण
मला इथल्या परंपरांची फारशी माहिती नाही. मला इथल्या चालीरीती माहिती नाहीत. मी इथे पहिल्यांदाच आलो आहे. एखाद्या कार्यक्रमात अशा प्रकारे तीर्थ किंवा चरणामृत दिले जाते, त्यामुळे मला तसेच वाटले आणि मी ते पिणार होतो. पण प्रत्यक्षात ते पृथ्वीला अर्पण केले जाणार होते. मला या गोष्टीची कल्पना नव्हती, पण मला चूक समजताच, मी चूक दुरुस्त केली.