UPSC CSE 2023 चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत एक हजार 16 उमेदवारांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी यूपीएससी या सर्वात कठीण परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे. मुलांना मिळालेल्या यशाचा जर सर्वात जास्त आनंद कोणाला होत असेल तर तो पालकांना होतो. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ आता समोर आला आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर, यशस्वी लोकांचे अनेक व्हिडीओ समोर येतात, जे चेहऱ्यावर हसू आणतात. नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्षितिज गुरभेले या IIT रुरकीचा पदवीधर आहे. जेव्हा क्षितिजने यूपीएससीची परीक्षा पास केली, तेव्हा त्याने आपल्या वडिलांना ही आनंदाची बातमी देण्यासाठी सर्वप्रथम त्यांचं ऑफिस गाठलं.
व्हिडिओमध्ये क्षितिज त्याच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याचे वडील आपल्या सहकाऱ्यांसोबत जेवण करत असतात. क्षितिज पटकन त्याच्या वडिलांकडे जातो आणि म्हणतो – जर एखादा मोठा अधिकारी आला तर उठायला हवं ना… क्षितिजच्या वडिलांना क्षणात समजलं की क्षितिज यूपीएससी उत्तीर्ण झाला आहे, त्यांनी त्याला आनंदाने मिठी मारली.
क्षितीज गुरभेले यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले – अशा प्रकारे UPSC CSE 2023 चा निकाल माझ्या वडिलांपर्यंत पोहोचला, जे त्यांच्या ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत जेवण करत होते. हा खास क्षण येण्यासाठी दोन वर्षांची मेहनत घेतली. या प्रवासात नेहमी माझ्यासोबत असल्याबद्दल आई, बाबा आणि बहिणीचे खूप खूप आभार. क्षितिजचा हा व्हिडिओ जवळपास 2 कोटी लोकांनी पाहिला आहे.
IIT-कानपूरचा माजी विद्यार्थी आदित्य श्रीवास्तव UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत अव्वल ठरला आहे. श्रीवास्तव आणि अनिमेश प्रधान यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला, त्यानंतर डोनुरु अनन्या रेड्डी यांनी तिसरा क्रमांक पटकावला. यूपीएससी उमेदवारांच्या अनेक प्रेरणादायी गोष्ट समोर आल्या आहेत.