मुंबई – गेल्या ३ महिन्यापासून कोरोना व्हायरसनं थैमान घातल्याने अनेकांच्या हातातून कामं गेली आहेत, लॉकडाऊनच्या या काळात मराठी इंडस्ट्रीलाही मोठा फटका बसला आहे, मालिकांचे शुटींग बंद झाल्याने छोट्या आणि नवोदीत कलाकारांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा या मराठी रंगभूमीवर कलाकार म्हणून काम करणाऱ्या रोहन पेडणेकवर सध्या ही वाईट परिस्थिती आली आहे.
मागील ३ महिन्यापासून रोहन पेडणेकर काम नसल्याने घरात बसून आहे, लॉकडाऊन वाढत असल्याने घरची आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करावा लागत आहे. पण निराश न होता रोहनने छोटा लघु व्यवसाय सुरु केला. कोणतीही आर्थिक मदत नको पण पडत्या काळात साथ द्या अशी भावनिक साद त्याने लोकांना घातली आहे. सुखा म्हावरा विकण्याचं काम रोहन पेडणेकरने काही मित्रांच्या मदतीने सुरु केला आहे. दादर ते बोरिवली मोफत घरपोच सेवा पोहचवली जाते, माशांचे विविध प्रकारे लोकांना घरपोच पोहचवले जातात. यातून मिळणाऱ्या पैशातून माझं घर चालवायला मदत होईल अशी अपेक्षा रोहन पेडणेकरने व्यक्त केली आहे.
याबाबत रोहन पेडणेकर याने सांगितले की, मला कोणाकडून पैसे उसणे नको, तुम्ही माझ्याकडून या वस्तू विकत घ्या, माझ्या घरी मी, माझी आई आणि सहा महिन्याची लहान बाळ आहे. नुकताच बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली, मी आत्महत्या करणार नाही, कलाकार असलो तरी मी खमका आहे. पण या परिस्थितीशी मी लढणार आहे, मरणं सोपं आहे पण जगणं कठीण आहे. त्यातून माझ्या लढाईत मला लोकांची साथ मिळेल, माझं कुटुंब सावरण्यासाठी मदत कराल अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.
रोहनने आतापर्यंत १०-१२ व्यावसायिक नाटके केली, ५-६ प्रायोगिक नाटके केली, स्वत:चं अटकमटक हे नाटक गेल्या २ वर्षापूर्वी आलं होतं, त्यात लेखन-दिग्दर्शन केलं. त्यातून अनेक पुरस्कार, बक्षीसं मिळाली. अलीकडेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मालिकेत सहस्त्रबुद्धे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. माझ्या घरासाठी आणि कुटुंबासाठी लोकांची साथ मिळेल असं आवाहन केलं आहे. अनेकांनी मला सांगितले की, तुला व्यवसाय करण्याची गरज नाही, तुझ्या ओळखीतील अनेकजण तुला पैसे देतील पण मला अशी मदत नको आहे असं आवाहन रोहन पेडणेकरने याने केलं आहे.