कधीकधी काही लोक आपल्या पसंतीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याच्या तयारीत असतात. पण अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका व्यक्तीने त्यांच्या प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी थेट बॅंकेवर दरोडा टाकला. ह्यूस्टनपासून साधारण १२० किलोमीटर अंतरावर ग्रोवेटॉनमध्ये ३६ वर्षीय हीथ बंपसने लग्नाच्या खर्चासाठी थेट बॅंकेवर दरोडा टाकला.
हीथकडे लग्नाची अंगठी आणि रिसेप्शनसाठी पैसे नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या खर्चासाठी पैसे हवे म्हणून हीथने बॅंकेवर दरोडा टाकला. नंतर जेव्हा हीथच्या होणाऱ्या पत्नीला याबाबत माहिती मिळाली तेव्हा तिने हीथला आत्मसमर्पण करण्यास तयार केलं.
पोलिसांनुसार, हीथ शुक्रवारी सकाळी हत्यार घेऊन ग्रोवेटॉनजवळील सिटीजन स्टेट बॅंकेत घुसला आि बंदुकीचा धाक दाखवत त्याने कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी केली. ते पैसे घेऊन हीथ जंगलातून फरार झाला. त्याचं लग्न शनिवारी होणार होतं. म्हणजे त्याने लग्नाच्या एक दिवसआधी हा दरोडा टाकला.
पोलिसांनी या घटनेचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला होता आणि आरोपीला ओळखून लवकरात लवकर त्याची माहिती पोलिसांना देण्याचं आवाहन केलं होतं. सोशल मीडियात पोलिसांनी शेअर केलेला व्हिडीओ हीथच्या होणाऱ्या पत्नीने देखील पाहिला. तिने हीथला फोन केला आणि त्याला पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले. तिने सांगितल्याप्रमाणे हीथ पोलिसांसमोर हजर झाला.
पोलीस अधिकारी वूडी वालेस यांनी सांगितले की, होणाऱ्या पत्नीचं ऐकून हीथने आत्मसमर्पण केलं. हीथने पोलिसांसमोर हे मान्य केलं की, त्याच्याकडे अंगठी घेण्यासाठी आणि लग्नाचा हॉल बूक करण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळेच त्याने हा दरोडा टाकला.