राजकीय पक्षांचे नेते निवडणुकांदरम्यान भरभरून घोषणा करतात. पण त्यातील मोजक्याच घोषणा पूर्ण होतात. अशात सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपला संताप व्यक्त करतात. पण मेक्सिकोमध्ये एक वेगळीच घटना बघायला मिळाली. येथे आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे एका महापौराला महिलेचे कपडे नेसवून शहरातून धिंड काढण्यात आली.
Indiatimes.com ने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण मेक्सिकोमधील ही घटना आहे. येथील महापौर जेविअर जिमेनेजचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात महापौर साहेब घागरा आणि चोळी घातलेले दिसताहेत. स्थानिक वृत्तपत्रांनुसार, स्थानिक नगर निगमच्या एका अधिकाऱ्यालाही स्थानिक लोकांनी महिलेचे कपडे घातले आणि त्याला बाजारात फिरवले.
इतकेच नाही तर जेव्हा महापौर आणि अधिकाऱ्याला शहरात फिरवले जात होते, तेव्हा लोक पोस्टर घेऊन मागे फिरत होते. त्यावर लिहिले होते की, यांनी त्यांच्या घोषणा पूर्ण केल्या नाहीत. El Diario de Mexico या स्थानिक वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, जेविअर जिमेनेजने आश्वासन दिले होते की, तो शहरातील पाणी व्यवस्था सुधारण्यासाठी ३ मिलियन पेसो म्हणजे साधारण १ कोटी ८ लाख रूपये आणेल. पण हे त्याने केलं नाही.
San Andres Puerto Rico येथील लोकांचा आरोप आहे की, जेविअरने ३ मिलियन पेसोचा घोटाळा केलाय. आता लोकांनी त्याला धमकी दिली आहे की, जर दुसऱ्यांदा त्याने आश्वासन पूर्ण केलं नाही तर त्याचं टक्कल केलं जाईल. आणखी एका रिपोर्टनुसार, लोकांनी या दोघांना चार दिवस बंद करून ठेवलं होतं.