कर्जात बुडालेल्या पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतातील मंडी बहाउद्दीन (Mandi Bahauddin) येथे हेलिकॉप्टरमधून पैशाचा पाऊस पाडला गेला. एका लग्न समारंभासाठी जमलेल्या वऱ्हाडी मंडळींवर हेलिकॉप्टरमधून फुलं आणि पैशाचा वर्षाव केला गेला. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्याचं लग्न आहे त्याचा भाऊ परदेशात वास्तव्याला असून आपल्या भावाच्या लग्नासाठी तो पाकिस्तानात परतला होता. त्यावेळी या भावानं भाडे तत्वावर हेलिकॉप्टर घेऊन लग्नाला जमलेल्या वऱ्हाडी मंडळींवर पैशाची बरसात केल्याचं बोललं जात आहे.
महत्वाची बाब अशी की पाकिस्तानात हे असं पहिल्यांदा घडत नाहीय. याआधी गुजरांवाला येथे एका उद्योगपतीनं आपल्या मुलाच्या लग्नात वऱ्हाडी मंडळींवर डॉलर्सची बरसात केली होती. याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी लोक चक्क गाड्यांवर उभं राहून पैसा वऱ्हाडी मंडळींवर पैशाची उधळण करत होते.
कर्जात बुडालंय पाकिस्तानपंतप्रधान इम्रान खान देशावरील वाढतं कर्ज आणि महागाईमुळे आधीच संकटात सापडले आहेत. देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. विविध देशांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन पाकिस्तानला आपले दिवस काढावे लागत आहेत. याआधी पाकिस्तानमधील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर १ लाख ७५ हजार रुपयांचं कर्ज आहे असा अहवाल समोर आला होता.