Parrot Viral Video : पोपट एक असा सुंदर पक्षी आहे जो बोलण्यात लोकांची नक्कल करण्यासाठी लोकप्रिय आहे. अनेकदा सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात पोपट मनुष्यांसारखे बोलताना दिसतात. मात्र, सध्या पोपटाचा एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात पोपटाचं एक वेगळंच टॅलेंट बघायला मिळालं. जे बघून तुम्हीही अवाक् व्हाल. आतापर्यंत तुम्ही बोलक्या पोपटांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. आता तुम्ही बघा एका 'डॉक्टर' झालेल्या पोपटाचा व्हिडीओ.
चीनच्या फोशानमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेल्या या व्हिडिओत सांगण्यात आलं आहे की, एका छोट्या मुलाच्या हातात एक पोपट आहे. तुम्ही बघू शकता की, मुलगा आपलं तोंड उघडतो आणि पोपट त्याच्या जवळ जातो. मुलाचा सैल झालेला दात पोपट आपल्या चोचेने खेचून काढतो. हे बघून लोक हैराण झाले आहेत. नंतर पोपट मुलाचा काढलेला दात एका दुसऱ्या व्यक्तीच्या हाती देतो.
पोपटाचा हा व्हिडीओ आश्चर्यकारक वाटू शकतो. पण मुळात त्यांची ही एक क्षमता आहे. काही भागांमध्ये पोपटांना त्यांची मजबूत चोच आणि कौशल्यामुळे मुलांचे दात काढण्यास मदत करण्यासाठी प्रशिक्षित केलं जातं.
दरम्यान, शिकागोच्या एक्सोटिक्स अॅनिमल हॉस्पिटलच्या एक्सपर्टनुसार, मानवी लाळेमध्ये रोगजंतूक असतात जे पक्ष्यांसाठी नुकसानकारक ठरू शकतात. हे जंतू पक्ष्यांसाठी विष ठरू शकतात. त्यामुळे असा सल्ला दिला जातो की, लोकांनी पक्ष्यांना आपलं नाक आणि तोंडाजवळ येऊ देऊ नये.