Rare Mandarin Duck : आसाममध्ये (Assam) एक दुर्मीळ मंदारिन बदक आढळून आला आहे. एक्सपर्ट्सनुसार, हा एक दुर्मीळ बदक आहे. हा बदक आसाममध्ये शेकडो वर्षांपासून दिसला नाही. हा पक्षी अखेरचा इथे १९०२ मध्ये आढळून आला होता. आता या दुर्मीळ बदकाला बघण्यासाठी लोक डिब्रू-साईखोवा नॅशनल पार्कच्या आत मागुरी सरोवराजवळ गर्दी करत आहेत.
हा बदक चीन, जपान, कोरिया आणि रशियातील काही भागांमध्ये आढळून येतो. सध्या तज्ज्ञ याचा शोध घेत आहेत की, हा पक्षी इतक्या वर्षांनी कसा आणि का आसामपर्यंत पोहोचला. आसामच नाही तर मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि पुणे येथील पक्षी प्रेमीही या बदकाला बघण्यासाठी येऊन गेले आहेत.
एक टूर गाइड आणि पक्षीप्रेमी माधव गोगोई यांनीही हा पक्षी पहिल्यांदा पाहिला. ते म्हणाले की, 'मी याला पहिल्यांदा ८ फेब्रुवारीला पाहिलं होतं. याला पाहून मी थक्क झालो होतो. हा पक्षी अखेरचा १९०२ मध्ये बघण्यात आलं होतं. ते म्हणाले की, हे बदक पूर्व आशियात अधिक आढळतात. १८व्या शतकात यांना इंग्लंडला नेण्यात आलं होतं. आधी चीन मोठ्या प्रमाणात या पक्ष्यांची निर्यात करत होता. पण १९७५ मध्ये या पक्ष्यांच्या निर्यातीवर बंदी आली.
माधव गोगोई म्हणाले की, भारत सामान्यपणे बदकांच्या ने-आण करणाऱ्या मार्गात येत नाही. त्यामुळे कदाचित हा पक्षी रस्ता भटकला असेल. हा पक्षी दुर्मीळ असूनही याला लुप्त होणारा जीव मानला जात नाही.