नवी दिल्ली - सोशल मीडियावर सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनाच #SareeTwitter या ट्रेंडने भुरळ घातली आहे. SareeTwitter हा हॅशटॅग वापरून महिला त्यांचे साडीतले सुंदर फोटो ट्वीट करत आहेत. सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन गोष्टी अपडेट होत असतात. एखादी गोष्ट झटपट व्हायरल होते. नवनवीन ट्रेंड हे सातत्याने येत असतात. गेल्या दोन दिवसांपासून #SareeTwitter ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटी आणि नेते मंडळीपर्यंत सर्वच हा ट्रेंड फॉलो करत आहेत.
SareeTwitter हॅशटॅगची अशी झाली सुरुवात
न्यूयॉर्क टाइम्समध्ये साडीविषयक एक आर्टिकल छापण्यात आले होते. या आर्टिकलमध्ये साडीची प्रतिष्ठा आणि इतिहास याबाबत माहिती देण्यात आली होती. 2014 मध्ये भाजपा सरकार सत्तेत आल्यावर साडीला प्रसिद्धी देण्यात आली. प्रमोट केलं गेलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीतील विजयानंतर बनारसी साडी विणकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत अशा आशयाचा मजकूर आर्टिकलमध्ये छापण्यात आला आहे. या आर्टिकलमधील काही गोष्टींमुळे अनेकजण नाराज झाले. त्यानंतर काही महिलांनी आपले साडीतील फोटो ट्विटरवर पोस्ट करायला सुरुवात केली. त्यामुळे सध्या #SareeTwitter हा ट्रेंड सुरू झाला आहे.
#SareeTwitter हा ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे. काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही हा ट्रेंड फॉलो केला आहे. प्रियंका गांधी यांनी बुधवारी (17 जुलै) 22 वर्षे जुना त्यांचा एक साडीतील फोटो ट्वीट केला आहे. प्रियंका यांनी '22 वर्षांपूर्वी माझ्या लग्नाच्या दिवशी सकाळच्या पूजेचा फोटो', असं कॅप्शन दिलं आहे. तसेच SareeTwitter या हॅशटॅगचाही वापर केला आहे.
महिलांनी SareeTwitter या हॅशटॅगचा वापर करून आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलल्या गेलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही त्यांचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. मला हा हॅशटॅग वापरण्याची संधी घालवायची नाही असं म्हणत त्यानी साडीतील त्यांचे चार फोटो ट्वीट केले आहेत.
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही या ट्रेंडला फॉलो करत पैठणी नेसलेला फोटो शेअर केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनेही तिचा साडीतील एक फोटो शेअर केला आहे.
सोमवारी (15 जुलै) सकाळपासून हा ट्रेंड सुरू झालेला पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही #SareeTwitter हा ट्रेंड फॉलो केला आहे. काँग्रेस नेत्या रागिनी नायक यांनीही अनेक फोटो शेअर केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.