भीक मागण्याचं चॅलेंज, कटोरा घेऊन रस्त्यावर बसतो युवक; १ तासात किती कमाई करतो पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 08:30 AM2024-12-11T08:30:40+5:302024-12-11T08:31:10+5:30
सोशल मीडियावर अनेकदा अनोखे व्हिडिओ व्हायरल होतात. रिल्स बनवण्यासाठी स्टार भन्नाट कल्पना शोधतात.
बऱ्याचदा आपण इन्स्टावर रिल्स बघण्यात वेळ घालवत असतो. त्यात तुम्ही अनेक इन्फ्लुएंसर्सचे व्हिडिओ पाहिले असतील ज्यात ते गरिबांची मदत करताना दिसतात. प्रत्येकाचा व्हिडिओ कन्टेंट बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात पश्चिम बंगालमधील एका रिलस्टारने भिकारी बनण्याचं चॅलेंज स्वीकारले होते. एका दिवसात तो भीक मागून किती पैसे कमावू शकतो हे त्याला पाहायचे होते त्यासाठी त्याने हा अनोखा प्रयोग केला.
या व्हिडिओच्या सुरुवातीला युवक बंगाली भाषेत त्याच्या प्रोजेक्टबाबत सांगताना दिसतो. त्यानंतर व्हिडिओत तुम्हाला तो युवक रस्त्यावर भिकेचा कटोरा घेऊन बसतो आणि येणा-जाणाऱ्यांकडून भीक मागताना पाहायला मिळतो. इतकेच नाही तर हा युवक रस्त्यावर फिरतो, वाटेत येणाऱ्यांकडून पैसे मागतो. काही लोक त्याला पैसे देतात तर काही नाही. एक २० रुपये देतो तर दुसरा २ रुपयेही देत होता.
परंतु या व्हिडिओची चांगली गोष्ट म्हणजे हा युवक त्याच्याकडे जमलेले पैसे एका गरजू महिलेला देतो. या युवकाला भीक म्हणून ३४ रुपये मिळतात आणि तो महिलेला पैसे देऊन निघून जातो. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यावर अनेक युझर्स रिएक्शन देत आहेत.
दरम्यान, या युवकाने हा व्हिडिओ पोस्ट करताना भीक मागण्याचं २४ तासाचे चॅलेज असं कॅप्शन दिले आहे. त्यावर फॉलोअर्सने भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. एकजण म्हणतो, व्हिडिओच्या शेवटी मन जिंकले तर दुसऱ्याने हा नवीन स्टार्टअप आहे असं सांगतो. तर रिल बनवण्यासाठी लोक आता भीकही मागू लागलेत, क्या बात है असं एक युजर्स म्हणतो. काहींनी लोक लाईक आणि व्ह्यूजच्या नादी लागून काय काय करतात असा प्रश्न उपस्थित केला.