अमेरिकेच्या अलास्का एअरलाइन्सचं एक विमान उड्डाण घेत असताना खिडकीचा काही भाग आकाशात तुटून हवेत उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आणि विमानात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आहे.
या दरम्यान कोणी जखमी झालं आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही घटना घडली तेव्हा विमानात 174 प्रवासी आणि सहा कर्मचारी होते. विमान कंपनीने सांगितले दिलेल्या माहितीनुसार, ते या घटनेची चौकशी करत आहेत. पोर्टलँड, ओरेगॉन येथून ऑन्टारियो, कॅलिफोर्नियाला जाणार्या अलास्का एअरलाइन्सच्या फ्लाइट 1282 च्या टेकऑफनंतर लगेचच एक घटना घडली.
174 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्ससह विमान पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे लँड केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विमानात लोक बसलेले असून खिडकीचा काही भाग तुटलेला दिसत आहे. सध्या या घटनेची तुफान चर्चा रंगली आहे.