मानेगावातील नर्सशी संबधित 10 जण क्वारंटाईन, तर सोलापुरातील नर्सचा पती पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 09:49 AM2020-04-28T09:49:30+5:302020-04-28T09:49:53+5:30
सोलापूर जिल्ह्यातील दोन नर्सेसच्या बाबतीत दोन वेगवेगळ्या घटना..
सोलापूर : स्वतः चा जीव धोक्यात घालून संकट काळात रुग्णांची सेवा बजावणाऱ्या दोन नर्सेसच्या बाबतीतही दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.
पहिली घटना माणेगावची आहे. चपळगांव (ता. अक्कलकोट) येथील आरोग्य केंद्रात सेवा देणारे खासगी रूग्णालयातील डॉक्टर कोरोना बाधित आढळले. या केंद्रातील नर्स सासरी म्हणजे मानेगाव (ता. बार्शी) येथे गेल्या होत्या. अक्षयतृतीयेचा सण त्यांनी सासूकडे साजरा केला. त्यावेळी त्यांना केंद्रातील डॉक्टराला कोरोना लागण झाल्याचे कळले. त्यामुळे सोमवारी सकाळी त्या चपळगावला परतल्या. आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्या १० जणांना क्वारंटाईन केले. तसेच त्यांच्याकडे घाणेगावचे पाहुणे आल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आरोग्य विभागाने घाणेगावला जाऊन तेथील १० पाहुण्यांना मराठी शाळेच्या विलगीकरण कक्षात ठेवल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत गुंड यांनी दिली. मानेगावात कुणालाही कोरोनाची लागण झाली नसून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, दुसऱ्या नर्सची घटना सोलापुरातील आहे. सोलापूरच्या शासकीय रूग्णालयातून निवृत्त झालेल्या नर्सच्या पतीला त्रास होऊ लागल्याने दोनवेळा ते रूग्णालयात उपचारासाठी आले़ पण तेथील डॉक्टरांनी लक्षणे नाहीत म्हणून त्यांना परत पाठविल्याचे सांगण्यात आले़. शेवटी वैतागून मुलाने जवळच्या खासगीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले़. या रूग्णालयाने स्वॅब तपासणीसाठी पाठविल्यानंतर २६ एप्रिल रोजी सारीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़. त्यामुळे त्यांच्या पत्नीलाही आता क्वारंटाईन करण्यात आल्याचे सांगण्यात आले़.
पाटकूल येथील महिला पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्या संपकार्तील लोकांना घरात अलगीकरण करण्यात आले आहे़. आतापर्यंत ३७२९ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले़. त्यापैकी १५५८ जणांचा कालावधी संपला आहे़. अद्याप २१७१ जण निगराणीखाली आहेत़. संस्थात्मक अलगीकरणात १६७५ व्यक्ती होत्या, त्यातील ९३५ लोकांचा कालावधी संपला आहे़ अद्याप ७४० जण निरीक्षणाखाली आहेत़ पाटकूल येथील महिला पंढरपुरातील एका खासगी रूग्णालयात बाळंत झाली़ त्यानंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या खासगी रूग्णालयातील दोन डॉक्टरांसह १४ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ भिमाशंकर जमादार यांनी दिली.