कुपोषण घटविण्यासाठी अंगणवाडीतील १० हजार बालकांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 02:46 PM2021-01-07T14:46:53+5:302021-01-07T14:47:58+5:30
कुपोषण घटविणार : वजन कमी असलेल्यांना देणार विशेष आहार
सोलापूर : जिल्ह्यातील अंगणवाडीतील १० हजार बालकांची वजन तपासणी होणार आहे. ज्या बालकांचे वजन कमी भरेल त्या बालकांना विशेष आहार पुरविण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी लोकमत शी बोलताना दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी महिला बाल कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांचा आढावा घेतला. त्यात ६५ बालके कुपोषित आढळली. या बालकांना विशेष आहार पुरवून जिल्हा कुपोषणमुक्त करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे महिला बाल कल्याण विभागाने गेल्या एक महिन्यापासून मोहीम सुरू केली. त्यात मंगळवेढा तालुक्यातील ११ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. इतर तालुक्यातील बालकांना विशेष आहार देण्यात येत आहे.
कुपोषणाची समस्या भविष्यात निर्माण होऊन, यासाठी रेषेवर असलेल्या बालकांचा शोध घेण्यात येत आहे. वय व उंचीप्रमाणे ज्या मुलांचे वजन कमी भरत आहे, अशांना या माेहिमेत समाविष्ट केले जाणार आहे. जिल्ह्यातील अंगणवाडीत २ लाख ७० हजार बालके आहेत. काेरोना काळात या बालकांच्या आहाराकडे दुर्लक्ष झाले होते. आता या बालकांसाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
विशेष आहार म्हणजे काय
साधारण अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार योजनेंतर्गत सध्या घरीच रेशन पुरविले जात आहे. यामध्ये गहू, तांदूळ, डाळींचा समावेश आहे, पण तरीही काही बालकांचे वजन कमी दिसते. अशा बालकांना प्रोटीन व प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधांची मात्रा असणारे एक चॉकलेट उपलब्ध आहे. बालकांचे वजन पाहून एक किंवा दोन चॉकलेट दिवसातून दोन वेळा खाऊ घातल्या जातात. त्याचबरोबर वजनवाढीसाठी शेंगदाणा चक्की, गूळ दिले जाते.
जिल्ह्यात यापूर्वी ५९ बालके कुपोषित आढळली होती. त्यामुळे त्यांना विशेष आहार देण्यात आला. आता या बालकांचे वजन वाढले आहे. अजूनही ज्या बालकांचे वजन धोक्याच्या रेषेवर आहे, अशा बालकांना विशेष आहार सुरू करण्यात येणार आहे.
जावेद शेख, महिला व बालकल्याण अधिकारी.
फोटो
वजन कमी असलेल्या बालकास विशेष आहार देताना अंगणवाडी कर्मचारी.