करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्यातील दहावीची विद्यार्थिनी ऑनलाईन शिक्षण घेत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील प्रियकरास भेटायला गेल्याच्या प्रकार घडला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील एका युवकाची फ्रेंड रिक्वेस्ट मान्य केली. त्यातून ओळख झाली आणि मैत्री झाली. त्यातून चॅटिंग सुरू झाले व पाहता पाहता हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. आता केवळ प्रेम करून भागत नाही तर समक्ष भेटले पाहिजे आणि पुन्हा एकत्र राहायचे असे दोघांचे ठरले. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपूर्वी परंड्याला शाळेत भेट द्यावयाची म्हणून मुलगी गेली ती गेलीच.
करमाळा पोलिसात तक्रार देण्यासाठी पालक निघाले असताना, भुसावळ येथून पोलिसांचा मुलीच्या पालकांना फोन आला आणि करमाळा पोलिसांचाही फोन आला. मुलगी भुसावळला असल्याचे व सुरक्षित असल्याचे कळाले. करमाळा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी तातडीने सर्व गोष्टींची माहिती घेतली व तेथील पोलिसांना मुलीच्या पालकांना पाठवत असल्याचे सांगितले. दरम्यान, टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनीही तेथील टायगर ग्रुपला याबाबतची माहिती देऊन मुलीची काळजी घेण्याचे कळविले. त्यानुसार मुलीचे पालक भुसावळला गेल्यानंतर खात्री करून पोलिसांनी मुलीला पालकांच्या ताब्यात दिले.
----
मुलगी पोलिसांपर्यंत कशी गेली?
मुलगी भुसावळ तालुक्यातील या मित्राच्या गावात गेली. तिथे त्याच्या घराची चौकशी करत असताना काही मुलांना तिचा संशय आला. तो मुलगा त्या वेळी शेतात गेला होता. नंतर या मुलांनी गावच्या पोलीस पाटलांना या मुलीची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटलांनी या मुलीला तत्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले.