एकाच गल्लीत ११ रुग्ण आढळल्याने १४ दिवसांसाठी सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:22 AM2021-04-16T04:22:21+5:302021-04-16T04:22:21+5:30
बार्शी शहरासह ग्रामीण भागात कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. मात्र, एकाच वेळी एकाच गल्लीत ११ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली ...
बार्शी शहरासह ग्रामीण भागात कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. मात्र, एकाच वेळी एकाच गल्लीत ११ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पाटील प्लॉट येथे तपासणी सुरू असताना या भागात हे रुग्ण आढळून आले. या भागात २५ हून अधिक घरे असून, १०० पेक्षा अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र, एकाच वेळी हे रुग्ण आढळून आल्याने प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. शिवाय प्रवेश प्रतिबंध करण्यात आला आहे.
नगरपालिका देणार मूलभूत सुविधा
११ रुग्ण आढळलेल्या गल्लीतील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा या नगरपालिकेच्या वतीने पोहोचविण्यात येणार आहेत. संबंधित घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अधिकारी महादेव बोकेफोडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी हा परिसर सील केला आहे. शिवाय, वयोवृद्ध रुग्णांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.