सोळा तासांत १२.७७ किलोमीटरचा महामार्ग तयार; ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’साठी प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 01:09 AM2021-02-27T01:09:13+5:302021-02-27T06:54:58+5:30
‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’साठी प्रस्ताव
सोलापूर : राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोळा तासांत १२.७७ किलोमीटर महामार्ग तयार केल्याचा दावा सोलापूर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आला. सोलापूर-विजयपूर महामार्गावर गुरुवारी पाच ठिकाणी एकाच वेळी फोर लेनचे काम झाले. डबल लेनची रुंदी ८.७५ मीटर आहे. सिंगल लेननुसार एकूण २५ किमी रस्ता पूर्ण झाला आहे. या कामाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’साठी प्रस्ताव पाठवत असल्याची माहिती राष्ट्रीय राजमार्ग विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
यापूर्वी गुजरात राज्यात २४ तासांत १० किमी महामार्ग तयार झाल्याची नोंद आहे. दोन महिन्यांपूर्वीच गुजरात येथील पटेल कंपनीने ही कामगिरी केली आहे. हैदराबाद येथील आयजेएम कंपनीने सोळा तासांत १२.७७ किलोमीटर महामार्ग तयार करून नव्या कामगिरीची नोंद दर्शवली आहे.२५ इंजिनिअर आणि ४५० कर्मचारी या कामासाठी २५ इंजिनिअर व ४५० कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सकाळी सहापासून रात्री दहापर्यंत काम सुरू होते. पाच पेव्हर मशीन, पंधरा रोलर आणि इतर मशिनरी तैनात होत्या.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात कमी वेळेत अधिक महामार्ग रस्ते निर्मितीचे काम सुरू आहे. गुरुवारी सोलापूर-विजयपूर महामार्गावर पाच ठिकाणी १२.७७ किमीचे काम झाले आहे. नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे.
- संजय कदम, प्रकल्प संचालक-राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण