सोलापूर : ग्राहकांच्या इच्छेप्रमाणे दागिने बनवून देणाºया बंगाली कारागिरांनी १३ लाख रुपये किमतीचे दागिने पळवून नेले. उत्तर कसबा येथील सोनाराची फसवणूक झाली असून, तिघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अकबर मन्सूर शेख, सैदुल शेख, फरदीन शेख (सर्व रा. ओम जीमशेजारी, भुसार गल्ली, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्रदीप श्रीपाद वेर्णेकर (वय ५५, रा. १२६७, उत्तर कसबा, सोलापूर) यांचे मंगळवार पेठ सराफ बाजार येथे श्रीपाद ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दुकानात येणाºया ग्राहकांना ज्या पद्धतीने डिझाईन हवी असते त्याप्रमाणे दागिने तयार करून दिले जाते. दागिन्यांचे डिझाईन तयार करण्याचे काम आरोपी असलेल्या बंगाली कारागिरांकडे दिले जात होते. सोन्याचे दागिने दुरुस्त करणे व दागिने घडवून देणे ही सर्व कामे कारागीर करीत होते.
प्रदीप वेर्णेकर यांनी दि. ४ ते २६ मे २०१९ दरम्यान ग्राहकांना हव्या असलेल्या नक्षीकामाचे व दरुस्तीचे १२ लाख ८४ हजार ९३८ रुपये किमतीचे दागिने कारागिरांकडे दिले होते. दागिन्यांचे काम झाले की नाही हे पाहण्यासाठी २८ मे रोजी वेर्णेकर यांचा कामगार महेश हलकुड हे कुंभार वेस येथील खोबरे नारळवाले यांच्या दुकानाजवळ ओम जीमशेजारी भुसार गल्ली येथील कारागिरांच्या दुकानी गेले. दुकानात कोणीही दिसून आले नाही.
हलकुड यांनी ही बाब गुरुनाथ वेर्णेकर यांना सांगितली. गुरुनाथ यांनी स्वत: जाऊन पाहणी केली असता तिघेही जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. गुरुनाथ यांनी याची कल्पना प्रदीप वेर्णेकर यांना दिली. सर्वांनी मिळून दिवसभर कारागिरांचा शोध घेतला. तिघांचाही मोबाईल नंबर लावला असता तो बंद लागत होता. या प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याची फिर्याद प्रदीप वेर्णेकर यांनी दिली. तपास सहायक पोलीस निरीक्षक साळुंखे करीत आहेत.
पंधरा वर्षांपासून होता व्यवहार...- प्रदीप वेर्णेकर यांचे गेल्या २४ वर्षांपासून सराफ बाजारात सोने खरेदी-विक्रीचे दुकान आहे. १५ वर्षांपासून बंगाली कारागीर वेर्णेकर यांच्या ग्राहकांचे दागिने बनवून देत होते. दुरुस्तीचे काम करून देत होते. तिघांवर वेर्णेकर यांचा चांगला विश्वास होता. पंधरा दिवसांचा विश्वास तोडून कारागीर पळून गेल्याने सराफ बाजारात खळबळ उडाली आहे.